पणजी : दयानंद बांदोडकर स्मृती फुटबॉल स्पर्धेत प्रथमच ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिनामधील क्लब खेळणार आहेत. स्पर्धेची दुसरी आवृत्ती २४ ऑगस्ट पासून सुरू होणार असल्याची माहिती क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी दिली. बुधवारी पर्वरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी गोवा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष कायतानो फर्नांडिस , उपाध्यक्ष जॉनथन डिसोझा हेही उपस्थित होते. (austrelian & argentine clubs to brace goan football)
मंत्री गावडे यांनी सांगितले की, गोव्याच्या फुटबॉल इतिहासात प्रथमच दोन विदेशी क्लब गोव्याच्या स्पर्धेत खेळणार आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियन लीग मधील ६७ वर्षे जुना ब्रिस्बेन रोअर तसेच अर्जेंटिना लीग मधील डिपोर्टीया डिफेंसिया वाय जस्टीसिया यांचा समावेश आहे. याशिवाय इंडियन सुपर लीग मधील एफसी गोवा, ओडीसा एफसी , चेन्नईयन एफसी , आय लीग मधील चर्चिल ब्रदर्स , धेंपो क्लब हे देखील स्पर्धेत सहभागी होतील.
स्पर्धेत दोन गटात प्रत्येकी चार संघ खेळतील. पहिल्या गटात एफसी गोवा, धेंपो, ब्रिस्बेन रोअर तसेच जी पी एल मधील पात्र संघ असेल. तर दुसऱ्या गटात ओडिशा, चेन्नईयन, चर्चिल ब्रदर्स आणि डिपोर्टीया यांचा समावेश आहे. स्पर्धेचे सर्व सामने फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळवण्यात येतील. अंतिम सामना ६ सप्टेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे. विजेत्यांना १५ लाख तर उपविजेत्यांना ८ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल.
सामन्यासाठी १०० ते २०० रुपये तिकीट शुल्क ठेवण्यात आले आहे. सामना सुरू असताना स्टेडियम बाहेर गेलेल्या प्रेक्षकांना कोणत्याही कारणास्तव स्टेडियम मध्ये पुन्हा प्रवेश दिला जाणार नाही. सर्व सामन्यांचे लाईव्ह स्ट्रिमिंग फिफा प्लस या चॅनल वर करण्यात येणार आहे. मागील वर्षीच्या स्पर्धेत सुमारे चार लाख लोकांनी लाईव्ह स्ट्रिमिंग द्वारे सामने पाहिले असल्याची माहिती मंत्री गोविंद गावडे यांनी यावेळी दिली दिली.