पणजी : पैंगीण -काणकोण येथे मालमत्तेचा वाद टोकाला पोहोचल्याने एकावर कोयत्याद्वारे जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात कोयत्याच्या मार लागून आंतोनिओ परेरा यांच्या डोक्याला दुखापत झाली. याप्रकरणी काणकोण पोलिसांनी सिद्धार्थ महाले यांस अटक केली असून त्यांना काणकोण येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. तर याप्रकरणी दूसरे संशयित विजय महाले यांनी अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार हल्ल्याची घटना ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४:३०च्या दरम्यान घडली. सिद्धार्थ महाले, विजय महाले व सुवर्णा भंडारी या संशयितांनी आंतोनिओ परेरा यांच्या मालमत्तेत घुसून त्यांना शिवीगाळ केली. वाद टोकास पोहोचल्याने सुवर्णा व विजय यांनी परेरा यांना पकडले व सिद्धार्थ यांनी कोयत्याचा वार केला. यात गंभीर जखमी झाल्याने, परेरा यांना बांबोळीच्या गोमेकॉत दाखल करण्यात आले असून त्यांवर उपचार सुरु आहेत.
मेलिबान फर्नांडिस (रा असोल्डा काणकोण) यांच्या फिर्यादीनुसार काणकोण पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९ (१),३५२,३२९(३) आर/डब्ल्यू ३(५) अन्वये सिद्धार्थ महाले, विजय महाले व सुवर्णा भंडारी यांच्यावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.
सदर बातमी अपडेट होत आहे.