रेहबर खान खून प्रकरण : संशयित निलेश तुपकरची सशर्थ जामिनावर सुटका

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
10th August, 05:00 pm
रेहबर खान खून प्रकरण : संशयित निलेश तुपकरची सशर्थ जामिनावर सुटका

म्हापसा:  सावळे, पिळर्ण येथे रेहबर खुर्शिद अली खान (२२ , मूळ उत्तर प्रदेश) याच्या खून प्रकरणातील संशयित आरोपी निलेश आत्माराम तुपकर (सर्वेवाडा, गिरी) याची म्हापसा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने सशर्थ जामिनावर सुटका केली.

न्यायाधीश शर्मिला पाटील यांनी संशयित तुपकर याची ५० हजारांची हमी रक्कम व तितक्याच रकमेच्या दोन हमीदारांच्या हमीवर जामीन मंजूर केला. न्यायालयातील प्रत्येक सुनावणीवेळी हजेरी लावणे, साक्षी पुराव्यात छेडछाड करू नये , साक्षीदारांना धमकावण्याचा प्रयत्न करू ऩये, न्यायालयाच्या परवानगीशिवाय गोव्याबाहेर न जाणे, अशा अटी न्यायालयाने जामीन मंजूर करतांना लागू केल्या आहेत. यापुर्वी न्यायालयाने या प्रकरणातील अन्य संशयित संदेश श्याम नाईक (रा. फट्टावाडो नेरूल व मूळ गवळीवाडा काकोडा) याची देखील सशर्थ जामीनावर सुटका केली होती.

न्यायालयात संशयिताच्या वतीने अ‍ॅड. विनायक पोरोब यांनी तर सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता आर. डिसोझा यांनी युक्तीवाद केला. दरम्यान, हा खूनाचा प्रकार १६ एप्रिल २०२४ रोजी उत्तर रात्री घडला होता. सावळे पिळर्ण, पर्वरी येथील ऑडिट भवनजवळ मयत रेहबरचा मृतदेह पोलिसांना गस्तीवेळी रस्त्यावर बेवारस स्थितीत सापडला होता. मयताचा मृत्यू माचे हाड मोडल्याने तसेच पाठीच्या कण्याला जबर इजा होत अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून निष्पन्न झाले होते.

 पोलिसांना चौकशीवेळी प्रेयसीचा छळ केल्याच्या रागातून प्रियकर संशयित विकास यादव (रा. कोदांळी) याने आपल्या १२  ते १५  साथीदारांच्या सहाय्याने मयताचा खून केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले होते. त्यानुसार पोलिसांनी भा.दं.सं.च्या १४३ , १४७ , ३४२ , ३६५ , ३९२ , २०१ , ३०२ व १४९  कलमांतर्गत गुन्हा नोंदवला होता.

पोलिसांनी  दि. १७ एप्रिल रोजी संशयित आरोपी खतेश तुकाराम कांदोळकर, सुमन हेमंत बरिक, सचिन चंद्रीका सहानी, तनय सुब्राय कांदोळकर व सचिन नागेंद्र सिंग (सर्व रा. कांदोळी) तर विकास यादव यास दि. १९ एप्रिल रोजी. तसेच दि. २० एप्रिल रोजी आनंद सहदेव चिकलगेकर (मयडे व मूळ वाळपई), संतोष उमेश गावस (म्हापसा), दि. २५ एप्रिल रोजी संदेश नाईक (नेरूल, मूळ काकोडा), निलेश आत्माराम तूपकर (गिरी) यांना अटक केली होती. तर संशयित आरोपी बिदेश (म्हापसा) हा अद्यापही फरार आहे.

या प्रकरणात वापरलेली जीए ०३ एएफ ७४४९ ही क्रेटा कार, जीए ०३ एच ५२०० ही पोलो कार, जीए ०३ एएस ३९२० व जीए ०३ एएस ७२०८ या दुचाकी तसेच कारमधून मयताचे कपडे, त्याचा मोबाईल फोन, हत्येसाठी वापरलेला स्क्रू ड्राईव्हर व इतर हत्यारे जप्त केली होती.

समोर आलेल्या माहितीनुसार;  मयत रेहबर हा त्याच्या सलून (चोगम रोडवरील) शेजारी असलेल्या मिनी सुपर मार्केटच्या मालकीणीवर एकतर्फी प्रेम करत होता. तिच्याशी जवळीक साधण्यासह नग्न फोटो मॉर्फ करून सोशल मिडियावर व्हायरल करत तिच्या पालकांना पाठवण्याची धमकी देऊन मानसिक छळ करत होता.

हा प्रकार तिने प्रियकर संशयित आरोपी विकास यादव याला सांगितला. घटनेच्या आदल्या दिवशी १५ एप्रिल रोजी रात्री १०:३० च्या सुमारास मयत त्या युवतीला भेटण्यासाठी आला असता पुर्वीच दबा धरून बसलेल्या संशयितांनी त्याला पकडून कारमध्ये कोंबून मारबडव केली. त्यानंतर त्याला तेथेच  रस्त्यावर लाथाबुक्क्यांनी व दंडुक्यांनी मारहाण केली. नंतर जखमी अवस्थेत त्याला तेथेच टाकून ते पसार झाल होते. २च्या सुमारास गस्तीवरील पर्वरी पोलिसांना मयत जखमी अवस्थेत सापडला होता. नंतर म्हापसा इस्पितळातील डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले होते.  




हेही वाचा