पालखी परिक्रमेला छत्रपती संभाजीराजेंच्या पुतळ्यामुळे अडथळा नाही : पंच विनायक वळवईकर

मारुती मंदिर ट्रस्टचा आरोप चुकीचा, जिल्हाधिकार्‍यांचा निर्णय मान्य असेल

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
10th August 2024, 03:42 pm
पालखी परिक्रमेला छत्रपती संभाजीराजेंच्या पुतळ्यामुळे अडथळा नाही : पंच विनायक वळवईकर

मडगाव : छत्रपती संभाजीराजेंच्या पुतळ्यामुळे पालखी परिक्रमेला अडथळा निर्माण होत असल्याचा मारुती मंदिर ट्रस्टचा दावा चुकीचा व दिशाभूल करणारा आहे. परिक्रमेसाठी पुरेशी जागा सोडलेली आहे. याप्रकरणी जिल्हाधिकार्‍यांनी बैठक घेतली असून अजून अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र जिल्हाधिकार्‍यांचा निर्णय आम्हाला मान्य असेल, असे शिवप्रेमी तथा स्थानिक पंच विनायक वळवईकर यांनी सांगितले.

रुमडामळ दवर्ली येथील मारुती मंदिराच्या समोरील जागेत छत्रपती संभाजीराजेंचा पुतळ्याची उभारणी शिवप्रेमींकडून करण्यात आलेली आहे. या पुतळ्यामुळे मंदिराच्या पालखी परिक्रमेला अडथळा होत असल्याची तक्रार मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष भाई नायक यांनी केली होती. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकही घेण्यात आली.  बैठकीत पुतळा स्थलांतरणाचा विषय आला असता शिवप्रेमींकडून त्या पर्यायाला मान्यता देण्यात आली नाही.तसेच बैठकीत कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण केला असता कोणत्याही प्रकारे शांतता बिघडू देणार नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही.

विनायक वळवईकर व इतर शिवप्रेमींनी शनिवारी पत्रकार परिषद घेत मारुती मंदिराच्या पालखी परिक्रमेसाठी पुरेशी जागा असून कोणताही अडथळा निर्माण झाला नसल्याचे सांगितले. हिंदू धर्माच्या रक्षणासाठी धर्मवीर संभाजीराजेंचा पुतळ्याची उभारणी केली, त्यात कोणताही स्वार्थ नाही. रुमडामळमधील परिस्थितीनुसार हा निर्णय घ्यावा लागला. असे  वळवईकर म्हणाले. मारुती मंदिराच्या कोणत्याही कार्यात अडथळा आणण्याचा हेतू नाही. धर्माचा आम्हालाही अभिमान असून त्यासाठी कोणत्याही पातळीवर जाण्यास तयार आहोत. मात्र, एका व्यक्तीमुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे. शांतता व सुव्यवस्था बिघडेल असे कोणतेही कार्य केले जाणार नाही, असे सांगतानाच जिल्हाधिकार्‍यांसोबतच्या बैठकीत जो निर्णय होईल तो मान्य असेल, असेही वळवईकर यांनी सांगितले.

हेही वाचा