म्हापसा : सतंतधार पावसामुळे शापोरा आणि पार नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने बार्देश तालुक्यातील मयते- अस्नोडा येथे गावात पुराचे पाणी भरले. तर कामुर्ली, कोलवाळ, रेवोडा व राण्याचे जुवे-नादोडा येथेही पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान जिल्हाधिकारी स्नेहा गीते यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
बुधवारी रात्री पासून कोसळणार्या मुसळधार पावसाने गुरूवारी सकाळीही जोर धरला. तसेच तिळारी व दोडामार्ग परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे शापोरा व पार नदीला पुर आला. पार नदीकाठी असलेल्या मयते-अस्नोडा गावात गुरूवारी सकाळी पुसदृश्य स्थिती निर्माण झाली, दुपार पर्यंत गावातील १२ घरांमध्ये गुडघाभर पाणी शिरले. त्यामुळे येथील लोकांची तारांबळ उडाली.
डिचोलीमध्ये उदभवलेल्या पुरसदृश्य स्थितीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या जिल्हाधिकारी स्नेहा गीते यांनी मयते गावाला भेट दिली व उपजिल्हाधिकारी कबीर शिरगावकर यांच्या समवेत पुराचा आढावा घेतला. यावेळी स्थानिक पंच सपना मापारी, तलाठी सुहास भर्तू व इतर अधिकारी उपस्थित होते. पाहणीनंतर जिल्हाधिकारी गीते यांनी उपजिल्हाधिकारी शिरगावकर व इतरांना रीतसर सूचना केल्या. तसेच पीडित नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरण करण्याचे आदेश दिलेत
दरम्यान, शापोरा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने किनारील गावात पुराचे पाणी शिरल्याने राण्याचे जुवे-नादोडा, रेवोडा, कोलवाळ व कामुर्ली या गावातील लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मामलेदार अनंत मळीक यांनी पंचायत तलाठ्यांसह वरील भागाला भेट देऊन नदीच्या पाणी पातळीचा आढावा घेतला.
सध्या मयते अस्नोडा येथे पुराची स्थिती नियंत्रणात आहे. नदीचे पाणी ओसरत आहे. पुराचे पाणी शिरलेल्या सर्व १२ ही कुटुंबातील सदस्यांना आपल्या नातेवाईकांकडे किंवा सुरक्षित स्थळी जाण्याची सूचना करण्यात आली असून तालुक्यातील इतर भागातील स्थितीही नियंत्रणात आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी कबीर शिरगावकर यांनी दिली.