वाहतूक धोरणावर टॅक्सीवाल्यांची टीका : गोवा माईल्स, मोपा लिंक रोडवरील टोल रद्द करण्याची मागणी
म्हापसा : पर्यटक टॅक्सी हा गोमंतकीयांच्या हातात असलेला एकमेव व्यवसाय आहे. हा व्यवसाय हिसकावून परप्रांतियांच्या हातात देण्याचे कटकारस्थान सरकारने राबवले आहे, असा आरोप करत गोवा माईल्स सोबतच मोपा लिंक रोडवरील टोल सेवा रद्द करण्याची मागणी केली.
म्हापसा येथील श्री बोडगेश्वर मंदिराच्या प्रांगणात बुधवारी राज्यभरातील पर्यटक टॅक्सी व्यावसायिक एकत्र आले. त्यांनी सरकारच्या वाहतूक धोरणांवर टीका केली.
चेतन कामत म्हणाले, गोवा माईल्स ही सेवा रद्द करण्याच्या मागणीसह मोपा लिंक रोडवरील टोल हटवा या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. याठिकाणी टॅक्सी व्यवसायिकांकडून टोल म्हणून ५०० रुपये शुल्क आकारले जाते. हा एकप्रकाराचा भ्रष्टाचार असून जीएमआर कंपनीच्या हितार्थ सरकार स्थानिकांच्या रोजगारावर गंडांतर आणत आहे. सरकारने हा टोल ताबडतोब हटवावा, अन्यथा आम्ही प्रवाशांना टोलवरच उतरविणार व तेथून हे पर्यटक चालत कुठे जायचे तिथे जावू देत.
मुख्यमंत्र्यांनी मॉविन गुदिन्हो यांची वाहतूक मंत्रिपदाच्या खुर्चीवरुन उचलबांगडी करावी. अद्याप त्यांना स्थानिक टॅक्सीवाल्यांचे प्रश्न सोडविता आलेले नाहीत. ते अकार्यक्षम मंत्री आहेत, असा आरोप कामत यांनी केला.
मोपा टॅक्सी व्यवसायिक रामा वारंग, श्रीकांत गावकर यांनीही सरकारच्या धोरणांवर टीका केली.
टॅक्सी व्यावसायिक सावियो यांनी गोवा माईल्सने स्थानिकांना संपविले असून ही सेवा रद्द होत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरुच राहणार असल्याचे सांगितले.
सरकार तसेच वाहतूक मंत्र्यांकडून सध्या टॅक्सी चालकांचे शोषण होत आहे. गोमंतकीयांच्या हातात हा एकमेव व्यवसाय राहिला आहे. तोही हिसकावून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सरकारला मनमानी कारभार चालवायचा असल्यास त्यांनी या टॅक्सी व्यावसायिकांना नोकऱ्या द्याव्यात, असे समाजिक कार्यकर्त्या तारा केरकर यांनी सांगितले.
वाहतूक मंत्र्यांनी त्यांना कोणी धमकी दिली ते दाखवावे. त्यात काही गैर असल्यास त्याचेही स्पष्टीकरण द्यावे. मंत्र्यांना धमकी दिली यावर उत्तर देणे मला गरजेचे वाटत नाही. सर्व प्रशासकीय यंत्रणा मंत्र्यांकडे आहेत, त्यांनीच शोध घ्यावा, असे चेतन कामत यांनी स्पष्ट केले.