तीनईघाट-अनमोड मार्गावरील हत्ती ब्रिजनजिकचा रस्ता वाहतुकीसाठी बंद

बुधवारी तीन वाहनांचे अपघात : वाहनचालक, प्रवासी, विद्यार्थ्यांना फटका

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
10th July, 06:21 pm
तीनईघाट-अनमोड मार्गावरील हत्ती ब्रिजनजिकचा रस्ता वाहतुकीसाठी बंद

खड्ड्यात कलंडलेले ट्रॅक्टर, टेम्पो व कंटेनर.

जोयडा : बेळगाव-गोवा राष्ट्रीय मार्गावरील तीनईघाट ते अनमोडच्या मध्यभागी असलेल्या हत्ती ब्रिजच्या बाजूने असलेल्या रस्त्यावरील खड्डे आणि त्यात साचलेल्या पाण्यातून वाट काढताना बुधवारी तीन अपघात घडले. त्यात तीन वाहने कलंडली. त्यामुळे हा मार्ग वाहनचालक, स्थानिक आणि प्रवाशांसाठी अत्यंत धोकादायक बनला होता. त्यानंतर प्रशासनाला उशिरा जाग आल्यानंतर हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
गेल्या आठ दिवसापासून हत्ती ब्रिजजवळ वाहने अडकून पडून वाहतूकीवर परिणाम होत आहे. बुधवारी येथे पाण्यातून वाट काढताना ट्रॅक्टर, टेम्पो आणि कंटेनर ही वाहने खड्ड्याचा अंदाज न आल्याने पलटी झाली. मात्र सुदैवाने कोणालाच गंभीर दुखापत झाली. मात्र येथून वाहने नेण्यासाठी वाहचालकांना जीवाशी खेळावे लागत आहेत.
खराब रस्त्यामुळे या मार्गाचा अवलंब करणाऱ्या अनमोड, जळक्कट्टी येथील स्थानिक नागरिक यांच्यासह 50 पेक्षा अधिक विद्यार्थांची प्रचंड गैरसोय होत आहे. बुधवारी दिवसभर वाहने पलटी झाल्याने गोवा- कर्नाटक असा प्रवास करण्याऱ्या लहान मोठ्या वाहनांसह, बस व स्वतःच्या वाहनातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका बसला. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने त्याकडे साफ दुर्लक्ष केल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला होता. मात्र उशिरा हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.


अवजड वाहनांना बंदी घाला
या मार्गांवरून पावसाळ्यात अवजड वाहनांना बंदी घाला, अशी मागणी वारंवार स्थानिकांकडून केली जात आहे, परंतु त्याकडे उत्तर कन्नड जिल्हा प्रशासनानेही दुर्लक्ष केले आहे. हत्ती ब्रिजवर वाहने अडकून पडत असल्याने या मार्गांवरून जाणारी हलकी वाहने तीनईघाट -मार संगळ - अनमोड या मार्गे वळविण्यात आली आहेत. मात्र अवजड वाहने मार संगळ रस्त्यावरून जाऊ शकत नसल्याने ती हत्ती ब्रिज येथूनच ये जा करीत आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका अधिक वाढला आहे.



बेळगाव-गोवा राष्ट्रीय महामार्ग अनमोड ते तीनईघाट पर्यंत धोकादायक बनला होता. स्थानिक राजकारणी, नेते यांचे साफ दुर्लक्ष या रस्त्याच्या स्थितीला कारणीभूत असून त्याचा फटका महामार्गलगत असलेल्या स्थानिकांना, विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. 
-गुरप्पा हणबर, उपाध्यक्ष, अखेती पंचायत