यंदा दूधसागर धबधबा १ जूनपासून पर्यटकांच्या वाहतुकीसाठी बंद

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
24th May, 03:42 pm
यंदा दूधसागर धबधबा १ जूनपासून  पर्यटकांच्या वाहतुकीसाठी बंद

पणजी : गोव्यात मोले येथील दूधसागर धबधब्यावर येण्याचे प्लॅनिंग करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. दूधसागर धबधबा यंदा १ जूनपासून पर्यटकांच्या वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. तसा आदेश उत्तर गोवा वन्यजीव, पर्यावरण आणि पर्यटन विभागाचे उपवनसंरक्षक यांनी जारी केला आहे. भगवान महावीर राष्ट्रीय उद्यान, मोले येथे स्थित दूधसागर धबधबा पर्यटन सर्किट वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद राहील, असे आदेशात म्हटले आहे. 

गोव्यातील मोले येथील दूधसागर धबधबा जगातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे. पावसाळ्यात तर त्याचे रूप मनमोहक होते. उंच डोंगरकपाऱ्यांतून कोसळणारे दूधासारखे पाणी बघण्याचा अनुभव काही वेगळात असतो. त्यामुळे पर्यटकांना तेथे जाण्याचा मोह होत असतो. पण, गेल्या काही वर्षांत येथे पर्यटक बुडण्याच्या घटना घडल्या आहेत. शिवाय हा वन्यप्राण्यांसाठी संरक्षित भागही आहे. याचीच दखल घेऊन पावसाळी हंगामात येथे पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या जीपवर बंदी घातली जाते. यंदाही अशीच बंदी उत्तर गोवा वन्यजीव, पर्यावरण आणि पर्यटन विभागाचे उपवनसंरक्षक यांनी जारी केली आहे. गेल्यावर्षी ११ जून २०२३ पासून ही बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर १५ ऑक्टोबरच्या आसपास ती हटवण्यात आली होती. मात्र, यंदा मान्सूनचे ढग वेळेत दाखल होणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे १ जूनपासूनच बंदी लागू करण्यात आली आहे. ती पुन्हा कधी हटवणार, हे मात्र स्पष्ट नाही.