गांजा बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक

८ लाख रुपये किमतीचा ८ किलो गांजा केला होता हस्तगत

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
23rd April, 12:02 am
गांजा बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक

मडगाव : निवडणूक आयोगाकडून स्थापन करण्यात आलेल्या पथकाकडून कुडचडे रेल्वे स्थानकावर सुमारे ८ लाख रुपये किमतीचा ८ किलो गांजा शनिवारी पकडण्यात आला होता. याप्रकरणी कुडचडे पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली आहे.
राज्यात लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी तपासणी पथकांची नियुक्ती जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांकडून करण्यात आलेली आहे. निवडणूक आयोगाच्या कुडचडे रेल्वेस्थानकावरील पथकाने ८ लाख रुपये किमतीचा ८ किलो गांजा पकडला व जप्त केला होता. पुढील कारवाई कुडचडे पोलिसांनी केली. गांजा बाळगल्याप्रकरणी संशयित श्रीधर राणा (२१, रा. कट्टक, ओडिशा) व ज्योतिराज प्रधान (२१, कंधामळ, ओडिशा) यांना ताब्यात घेतले. चौकशीअंती दोघांनाही रितसर अटक केली. पोलीस निरीक्षक वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मयुर पणशीकर यांच्याकडून तपास करण्यात येत आहे.