लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील दारू वाहतुकीवर करडी नजर

बेळगाव येथे सीमावर्ती भागातील पोलीस अधिकाऱ्यांची बैठक

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
19th April, 12:38 am
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील दारू वाहतुकीवर करडी नजर

बेळगाव : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील चेकपोस्टवर अतिरिक्त दक्षता ठेवण्यासाठी तीन राज्यांच्या सीमावर्ती जिल्ह्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांची बेळगाव येथे बैठक झाली.

बेळगाव येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात गुरुवारी झालेल्या या बैठकीला गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमावर्ती जिल्ह्यांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

कर्नाटक उत्तर परिक्षेत्राचे आयजीपी विकास कुमार बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या राज्यांतून येणाऱ्या वाहनांवर चोवीस तास लक्ष ठेवण्याबाबत अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. गोव्यातून होणाऱ्या अवैध दारू वाहतुकीवर चोवीस तास सतर्कता ठेवण्याबाबत चर्चा करण्यात आली. येथील सीमावर्ती जिल्ह्यांतील संवेदनशील भागात दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या, असे बेळगावचे पोलीस आयुक्त इडा मार्टिन मारबानियांग यांनी सांगितले.

गोवा, कोल्हापूर, सांगली आणि इतर जिल्ह्यांतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ऑनलाइन बैठकीत सहभाग घेतला. पोलीस महानिरीक्षक विकास कुमार, कोल्हापूरचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, गोव्याचे पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंग, बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त इडा मार्टिन मारबानियांग, बेळगावचे एसपी डॉ. भीमाशंकर गुलेद, विजयपुरा एसपी ऋषिकेश सोनवणे, कोल्हापूरचे एसपी महेंद्र पंडित, डीसीपी रोहन जगदीश आणि इतर अधिकारी उपस्थित होते.