निलंबित हवालदार तळकर, कळंगुटकर यांच्या पोलीस कोठडीत वाढ

जामीन अर्जावर २२ रोजी सुनावणी

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
19th April, 12:35 am
निलंबित हवालदार तळकर, कळंगुटकर यांच्या पोलीस कोठडीत वाढ

पणजी : लाच प्रकरणात भ्रष्टाचार विरोधी पथकाने (एसीबी) अटक केलेल्या निलंबित हवालदार संजय तळकर आणि उदयराज उर्फ राजू कळंगुटकर या दोघांना न्यायालयाने २२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. या दोघांनी पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी २२ रोजी होणार आहे.

एसीबीने पृथ्वी एच. एन. यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. त्यानुसार पृथ्वी एच. एन. केरी किनारी परिसरात पॅराग्लायडिंग व्यवसाय करतात. त्यांच्याकडे परवाना नसल्याचा दावा करून जानेवारी २०२४ मध्ये प्रति महिना १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी हवालदार संजय तळकर याने केली होती. संबंधित पोलीस अधिकाऱ्याच्या मध्यस्थीमुळे लाचेची रक्कम ८ हजार रुपये करण्यात आली होती. तक्रारदाराने अॅपद्वारे ८ हजार रुपये दिले. दरम्यान, २२ मार्च रोजी संशयित व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी मिळून तक्रारदाराच्या विरोधात खोट्या आरोपांवरून गुन्हा दाखल केला. त्याचे पॅराग्लायडिंग जप्त करण्यात आले. मात्र या संदर्भात योग्य दस्तावेज न करता कारवाई करण्याचा बनाव करण्यात आल्याचा दावा तक्रारदाराने तक्रारीत केला आहे. तसेच या प्रकरणी तक्रारदाराने पुरावेही सादर केले. याची दखल घेऊन एसीबीने संजय तळकर याच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल केला. याची माहिती मिळताच तळकर याने पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. तो फेटाळल्यानंतर एसीबीने त्याला अटक केली. तर या प्रकरणात सहभागी असल्यामुळे हवालदार उदयराज उर्फ राजू कळंगुटकर यालाही अटक केली आहे.

दरम्यान, त्या दोघांना पोलीस खात्याने निलंबित केले आहे. अटक केलेल्या दोघांना न्यायालयाने प्रथम १८ रोजी पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली होती. ती संपल्यानंतर गुरुवारी त्यात वाढ करून २२ रोजीपर्यंत एसीबीची कोठडी ठोठावली. दरम्यान, त्या दोघांनी न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जावर २२ रोजी पुढील सुनावणी होणार आहे.