हैदराबाद येथील ड्रग्ज प्रकरणी क्लब मालक एडवीन नुनीससह इतरांविरोधात आरोपपत्र

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
19th April, 12:11 am
हैदराबाद येथील ड्रग्ज प्रकरणी क्लब मालक एडवीन नुनीससह इतरांविरोधात आरोपपत्र

पणजी : हैदराबाद येथील ड्रग्ज तस्करी प्रकरणात गोव्यातील प्रसिद्ध क्लबचे मालक एडविन नुनीस, जाॅन स्टीवन डिसोझा, संजय गोवेकर यांच्यासह प्रीतेश उर्फ बाबा (काली) बोरकर, तुकाराम उर्फ नाना साळगावकर, विकास उर्फ विकी नाईक यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणी उस्मानिया विद्यापीठ पोलिसांनी हैदराबाद येथील अतिरिक्त मेट्रोपोलिटन सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १४ मे रोजी होणार आहे.

हैदराबाद येथील नाल्लाकुंटा पोलीस स्थानकात ३१ मार्च २०२२ रोजी ड्रग्ज तस्करी प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी संशयित प्रीतेश बोरकर याला हैदराबाद पोलीस १ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी हणजूण येथून घेऊन गेले होते. त्यानंतर हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठ पोलिसांनी प्रीतेश बोरकरला १६ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ७.४५ वा. हाबसीगुडा येथील काकाटिया नगर परिसरात ड्रग्ज तस्करी प्रकरणी ताब्यात घेतले. बोरकर याची चौकशी केली असता, तो फोंडा येथील असून हणजूण येथे आल्यानंतर त्याची ओळख काश्मिरी युवक मन्सूर अहमदशी झाली. ते दोघे मिळून तुकाराम उर्फ नाना साळगावकर, विकास उर्फ विकी नाईक, रमेश चौहान, स्टीवन, एडविन नुनीस, संजय गोवेकर यांच्याकडून कमी दरात ड्रग्ज खरेदी करून विकत असल्याची माहिती दिली. तसेच गोव्यातील पर्यटकांसह ते दोघे हैदराबाद येथेही ड्रग्ज पुरवठा करू लागले, अशी माहिती प्रीतेशने हैदराबाद पोलिसांना दिली. याची दखल घेऊन उस्मानिया विद्यापीठ पोलिसांनी बोरकरसह मन्सूर अहमद, नाना साळगावकर, विकी नाईक, रमेश चौहान, स्टीव, एडवीन नुनीस, संजय गोवेकर यांच्यासह १७४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर हैदराबाद पोलिसांनी एडवीन नुनीस याच्यासह इतर संशयितांना अटक केली होती. त्यानंतर सशर्त जामिनावर सुटका करण्यात आली.

दरम्यान, उस्मानिया विद्यापीठ पोलिसांनी तपास पूर्ण करून एडविन नुनीस, जाॅन स्टीवन डिसोझा, संजय गोवेकर यांच्यासह प्रीतेश बोरकर, नाना साळगावकर, विकास उर्फ विकी नाईक यांच्या विरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.

एकाहून जास्त ड्रग्ज प्रकरणात सहभागी असल्यामुळे हैदराबाद पोलिसांनी एडवीन नुनीस याला प्रतिबंधक अटक करून तुरुंगात टाकले होते. त्याला नुनीस याने तेलंगणा उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर त्याला मुक्त करण्यात आले.