गेल्यावेळी केवळ सासष्टीनेच केला होता सावईकरांंचा घात!

आठ मतदारसंघांतून काँग्रेसच्या सार्दिननी मिळवली होती दुप्पट मते

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
18th April, 01:15 am
गेल्यावेळी केवळ सासष्टीनेच केला होता सावईकरांंचा घात!

पणजी​ : गत २०१९च्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यात २० पैकी प्रत्येकी दहा मतदारसंघांत काँग्रेस उमेदवार फ्रान्सिस सार्दिन आणि भाजप उमेदवार नरेंद्र सावईकर यांनी आघाडी घेतली होती. परंतु, सासष्टीतील आठ मतदारसंघांमध्ये सार्दिन यांनी सावईकरांपेक्षा दुप्पट मते मिळवल्याने त्यांचा विजय झाला होता.
२०१९च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार फ्रान्सिस सार्दिन यांना २,०१,५६१ मते मिळाली होती. तर, भाजप उमेदवार नरेंद्र सावईकर यांना १,९१,८०६ मते मिळाली होती. त्यावेळी सावईकर यांचा ९,७५५ मतांनी पराभव झालेला होता. या दोन्ही उमेदवारांनी दक्षिणेतील वीसपैकी प्रत्येकी दहा मतदारसंघांमध्ये एकमेकांविरोधात आघाडी घेतली. पण, सासष्टीतील नुवे, कुडतरी, फातोर्डा, मडगाव, बाणावली, नावेली, कुंकळ्ळी आणि वेळ्ळी या आठ मतदारसंघांमध्ये सार्दिन यांनी सावईकरांपेक्षा दुप्पट मते मिळवली होती. त्यामुळेच त्यांना विजय मिळालेला होता. या आठ मतदारसंघांतून सार्दिन यांना ९८,९५४ मते ​मिळाली होती, तर सावईकर यांनी ४७,६३४ मते मिळवली होती.
२०१७च्या विधानसभा निवडणुकीत सासष्टीतील आठपैकी नुवे, कुडतरी, मडगाव, नावेली, कुंकळ्ळी आणि वेळ्ळी हे सहा मतदारसंघ काँग्रेसकडे होते. तर, बाणावली राष्ट्रवादी काँग्रेसकडे आणि फातोर्डा गोवा फॉरवर्डकडे होता. विधानसभा निवडणुकीनंतर गोवा फॉरवर्डने भाजपशी हातमिळवणी केली होती. त्यामुळे काँग्रेसकडे सात मतदारसंघ राहिलेले होते. यावेळी मात्र आठपैकी नुवे, कुडतरी, मडगाव आणि नावेली हे चार मतदारसंघ भाजपकडे, तर फातोर्डा, बाणावली, कुंकळ्ळी आणि वेळ्ळी हे चार मतदारसंघ इंडि आघाडीकडे आहेत. याशिवाय दक्षिण गोव्यातील एकूण वीसपैकी १४ मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार आहेत. सोबतच २०१९ मध्ये भाजपच्या सावईकरांना ज्या कुठ्ठाळी आणि केपे मतदारसंघांतून कमी मते मिळालेली होती, त्यातील कुठ्ठाळीचे आमदार आंतोन वाझ भाजपसोबत आहेत, तर केपेचे माजी आमदार तथा माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकरही भाजपसोबत आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्यासह इतर प्रमुख नेते दक्षिण गोवा काबीज करण्याच्या प्रयत्नांत आहेत.

सासष्टीतील आठ मतदारसंघांतील मते
मतदारसंघ...... सार्दिन...... सावईकर
नुवे ......१४,६४० ......२,५२५
कुडतरी...... १३,५९१ ...... ५,२४५
फातोर्डा ......१०,६९६ ......१०,०५८
मडगाव ......११,०८२ ...... ९,०४६
बाणावली ......१३,१२० ......२,४१४
नावेली ......११,३५३ ......६,७५४
कुंकळ्ळी ......१०,०५९ ...... ७,४३९
वेळ्ळी ......१४,४१३ ......४,१५३            

हेही वाचा