काँग्रेस उमेदवारांचे अर्ज दाखल

प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्यासह इंडि आघाडीतील नेत्यांची उपस्थिती

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
18th April, 01:10 am
काँग्रेस उमेदवारांचे अर्ज दाखल

मडगाव/पणजी : इंडि आघाडी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी उत्तर गोव्याची उमेदवारी देऊन माझ्या गळ्यात विजयाची माळ घातली आहे. त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास उत्तर गोव्यातील काँग्रेसचे उमेदवार अॅड. रमाकांत खलप यांनी व्यक्त केला. श्रीरामनवमीच्या शुभदिनी अॅड. खलप यांनी उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी दुपारी १२.३० वा. उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी ते बोलत होते.       

यावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, हळदोणाचे आमदार कार्लोस फरेरा आणि आम आदमी पार्टीचे गोवा समन्वयक अमित पालेकर यावेळी उपस्थित होते. दरम्यान, काँग्रेसचे उत्तर गोव्याचे उमेदवार अॅड. खलप यांनी पणजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी स्नेहा गिते यांच्यासमोर उमेदवारी अर्ज सादर केला.       

तत्पूर्वी, उमेदवारी अर्ज भरताना पणजी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह इंडि आघाडीच्या नेतृत्वाखालील आप, गोवा फॉरवर्ड आणि शिवसेनेचे कार्यकर्ते जमले होते. बँड आणि फटाक्यांच्या आतषबाजीसह कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढली.

लोकसभा निवडणुकांतील दक्षिण गोव्यातील काँग्रेस उमेदवार कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी रामनवमीचे औचित्य साधत दक्षिण गोवा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन चंद्रू ए. (आयएएस) यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, गोवा फॉरवर्ड अध्यक्ष विजय सरदेसाई, आमदार कॅ. व्हेंझी व्हिएगस उपस्थित होते. अर्ज सादर करण्यापूर्वी कॅ. विरियातो यांनी फातोर्डा येथील दामोदर देवस्थानात जात व कपेलमध्ये प्रार्थना करत आशीर्वाद घेतले. यानंतर काँग्रेस कार्यालयानजीक काँग्रेससह इंडि आघाडीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. 

प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले की, राज्यातील रेल्वे दुपरीकरणाचा विरोध करताना, लढा देताना हा खटला त्यांच्याविरोधात असल्याने याचा आम्हाला अभिमान आहे, की गोवा राखण्यासाठी झगडणाऱ्या कॅ. विरियातो फर्नांडिस यांच्यावर राज्य सरकारने खटला दाखल केला. लोकांसाठी झगडणारा उमेदवार आघाडीकडून देण्यात आला, याचा अभिमान असून दक्षिण गोव्यातील लोकांनाही हा अभिमान असावा, असे पाटकर म्हणाले. 

सरकारचे अपयश धेंपोंकडूनच उघड : सरदेसाई

गोव्यातील बेरोजगारी ही देशात सर्वात जास्त आहे आणि पल्लवी धेंपो यांनीही लोकांनी बेरोजगारी, महिला सक्षमीकरणाबाबत प्रश्न केल्याचे सांगत राज्य सरकार नोकऱ्या देण्यात अपयशी ठरल्याचे स्पष्ट केले आहे. राज्य सरकार नोकऱ्या विकत असल्याने स्थानिकांना रोजगार मिळत नाही. लोकांचे जगणे सुसह्य करण्यासाठी, पर्यावरण, गोवा राखण्यासाठी झगडणाऱ्या उमेदवाराच्या पाठिशी रामाचे आशीर्वाद असतील व लोकांनीही त्यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन विजय सरदेसाईंनी केले. 

काँग्रेस पक्ष गोव्यातील जनतेला चांगला उमेदवार देईल, हे आश्वासन आम्ही आज पूर्ण केले आहे. दोन्ही उमेदवार यापूर्वी गोव्यासाठी लढले असून त्यांनी अनेक कामे केली आहेत. गोवा सांभाळण्यासाठी राज्यातील काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, शिवसेना, आप, तृणमूल काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस असे सर्व पक्ष एकत्र आलेत. — युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते 

सर्वसामान्यांची लढाई दिल्लीपर्यंत नेणार : कॅ. विरियातो

सरकारकडून गोवा सांभाळण्यासाठी झगडणारे कार्यकर्ते, संस्था, लोकांवर गुन्हे नोंद केले जातात, मायनिंग बंद करत अनेकांना उघड्यावर सोडले, शेतकऱ्यांची फसवणूक केली, युवकांना रोजगार नाही, महिलांवर अत्याचार होत आहेत. ही उमेदवारी केवळ आपली नाही तर सरकारमुळे अडचणीत असलेल्या सर्वसर्वसामान्य लोकांची आहे. ही लढाई गोव्यातून दिल्लीपर्यंत नेणार, असे मत कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी व्यक्त केले.   

हेही वाचा