लोकसभा निवडणुकीत ‘नोटा’ मतांमध्ये किंचित वाढ

२०१४ मध्ये १.२४ टक्के, तर २०१९ मध्ये १.४६ टक्के मते ‘नोटा’ला

Story: पिनाक कल्लोळी |
18th April, 12:55 am
लोकसभा निवडणुकीत ‘नोटा’ मतांमध्ये किंचित वाढ

गोवन वार्ता

पणजी : गोव्यात २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ‘नोटा’ म्हणजेच ‘वरील पैकी कुणीही नाही’ अशा मतांच्या तुलनेत २०१९ मध्ये किंचित वाढ झाली होती. २०१४ मध्ये एकूण मतांच्या १.२४ टक्के मते ‘नोटा’ होती. २०१९ मध्ये हीच टक्केवारी १.४६ झाली होती. असे असले तरी मागील दोन विधानसभा निवडणुकांची आकडेवारी पाहता २०१७ च्या तुलनेत २०२२ मध्ये ‘नोटा’ मतांची संख्या घटली आहे.
निवडणुक आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार, २०१४ मध्ये दोन्ही मतदासंघांत मिळून ८ लाख ६ हजार ८९७ मतदान झाले होते. यात १० हजार १०३ ‘नोटा’ मते होती. उत्तर गोवा मतदासंघात ५,७७० तर दक्षिण गोवा मतदारसंघात ४,३३३ ‘नोटा’ मतदान झाले होते. उत्तर गोव्यात झालेल्या एकूण मतदानापैकी नोटा मतांचे प्रमाण १.४२ टक्के होते. दक्षिण गोव्यात एकूण मातदनाच्या ‘नोटा’चे प्रमाण १.०६ टक्के होते.
२०१९ च्या लोकसभा निवडणूकीत दोन्ही मतदासंघांत एकूण ८ लाख ४० हजार ७०४ वैध मते होती. यांतील १२ हजार ४९९ मते ‘नोटा’ होती. मतदारसंघनिहाय पाहता उत्तर गोवा मतदासंघात ७,०६३ तर दक्षिण गोवा मतदारसंघात ५,४३६ ‘नोटा’ मतदान झाले होते. उत्तर गोव्यात झालेल्या एकूण मतदानापैकी ‘नोटा’ मतांचे प्रमाण १.६५ टक्के होते. दक्षिण गोव्यात एकूण मातदनाच्या ‘नोटा’चे प्रमाण १.२८ टक्के होते.
२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत पर्येत सर्वाधिक ‘नोटा’ मते
गेल्या दोन विधानसभा निवडणुकांची तुलना करता ‘नोटा’ मतांची संख्या किंचित कमी झाल्याचे दिसते. २०१७ मध्ये एकूण १० हजार ९३० ‘नोटा’ मतदान झाले होते. ‘नोटा’ मतांची टक्केवारी १.२० होती. २०२२ मध्ये १० हजार ६२९ ‘नोटा’ मतदान झाले होते. यावर्षी ‘नोटा’ मतांची टक्केवारी १.१३ इतकी होती. २०२२ मध्ये पर्ये मतदासंघात सर्वाधिक ५४२ ‘नोटा’ मते पडली होती. त्याखालोखाल पर्वरी मतदासंघात ४७३ ‘नोटा’ मते पडली होती.
‘नोटा’चा पर्याय का अंमलात आला ?
निवडणुकीत एखाद्या मतदासंघांत निवडणूक लढवणारा एकही उमेदवार पसंत नसल्यास ‘नोटा’ म्हणजेच ‘वरील उमेदवारांपैकी कुणीही नाही’ असा पर्याय देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. यानंतर देशामध्ये सर्वप्रथम २०१३ च्या छत्तीसगढ, मध्य प्रदेश, मिझोरम, राजस्थान आणि दिल्लीत झालेल्या मतदानावेळी ‘नोटा’ हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला होता. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत हा पर्याय प्रथमच देशात सर्वत्र उपलब्ध झाला होता.

हेही वाचा