ताळगावात बाबूश विरोधात इंडी आघाडी शक्य

नेत्यांमध्ये चर्चा : आपच्या नेत्या सेसिल रॉड्रिग्ज यांची माहिती


18th April, 12:36 am
ताळगावात बाबूश विरोधात इंडी आघाडी शक्य

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : लोकसभा निवडणुकीबरोबरच ताळगाव पंचायत निवडणुकीत इंडी आघाडी मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या पॅनल विरोधात लढण्याची शक्यता आहे. सध्या बाबूश यांच्या पॅनलविरुद्ध रणनीती ठरवण्यासाठी आघाडीतील नेत्यांच्या बैठका आणि चर्चा सुरू आहेत. उमेदवारांची अंतिम यादी जाहीर झाल्यावर चित्र स्पष्ट होणार आहे.
बाबूश यांच्या प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट फ्रंट पॅनलच्या सर्व अकरा उमेदवारांनी आपले अर्ज पहिल्याच दिवशी, ८ एप्रिल रोजी भरले आहेत. त्यांच्या विरोधात उमेदवारी दाखल करण्यासाठी इच्छुकांनी बराच वेळ घेतला आहे. आठ दिवसानंतर १६ एप्रिलपर्यंत बाबूश यांच्या पॅनेलविरुद्ध फक्त पाच जणांनीच उमेदवारी अर्ज भरले आहेत. ते कुठल्या पॅनलचे उमेदवार आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या संदर्भात ताळगावच्या आम आदमी पक्षाच्या नेत्या सेसिल रॉडिग्ज यांना विचारले असता त्या म्हणाल्या, सध्या लोकसभा निवडणुकीसाठीचे अर्ज भरले जात आहेत. त्यात आम्ही सर्व व्यग्र असल्याने विरोधी पक्षाला ताळगाव पंचायत निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्यास विलंब लागला आहे. आम्ही सध्या सर्वसमावेशक विरोधक म्हणून ताळगाव पंचायत निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे.
ताळगावात काँग्रेस, आप आणि आरजी या तिन्ही पक्षांची एकूण मतांची संख्या भाजपच्या मतांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीप्रमाणे ताळगाव पंचायत निवडणूक इंडी आघाडीसोबत लढण्याचा आमचा विचार आहे. या तिन्ही पक्षांतील इच्छुक उमेदवार आपल्या आणि दुसऱ्या प्रभागातील उमेदवारांबरोबर बैठका घेऊन चर्चा करत आहेत. काही जणांनी अर्ज भरले आहेत, तर काही जण गुरुवारी अर्ज भरणार आहेत.
अद्याप आम्ही कुठलेही पॅनेल निश्चित केलेले नाही. १९ रोजी अर्जांची छाननी झाल्यानंतर आम्ही बाबूश यांच्या विरोधातील पॅनलची घोषणा करणार आहोत. याबाबत आम्ही आरजी आणि काँग्रेसच्या नेत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याशी संपर्क झालेला नाही, अशी माहिती सेसिल यांनी दिली.
या संदर्भात स्थानिक नागरिकांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता पक्ष पातळीवर निवडणूक होण्याची चिन्हे दिसत नाहीत आणि ती होण्याची शक्यताही नाही. आपल्या प्रभागात काम करणारे उमेदवार आणि उमेदवारांसाठी स्थानिक आमदारांनी केलेली कामे पाहूनच यावेळी मतदान होणार आहे, असे येथील एक स्थानिक नागरिक उदय शिरोडकर यांनी सांगितले.
प्रभाग १ मध्ये बिनविरोध निवड शक्य
ताळगावच्या प्रभाग १ मधील उमेदवार बिनविरोध निवडून येणार, असे चित्र दिसून येत आहे. ओबीसी राखीव प्रभागात बाबूश मोन्सेरात यांच्या गटाच्या उमेदवार सिद्धी केरकर यांच्या विरोधात अद्याप कोणीही पुढे आलेले नाही. एका उमेदवाराने तयारी केली होती, परंतु कमी वेळेत त्याला ओबीसी प्रमाणपत्र मिळवणे शक्य झाले नाही. त्यामुळे सिद्धी केरकर यांची बिनविरोध निवड होते का, हे गुरुवारी सायंकाळी स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा