लोलये येथे चोरट्यांनी फोडली तीन घरे

एका घरातील लाखोंचा ऐवज लंपास

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
18th April, 12:39 am
लोलये येथे चोरट्यांनी फोडली तीन घरे

काणकोण : काणकोणात लोलये पंचायत क्षेत्रातील बंद घराला चोरट्यांची लक्ष्य केले असून लोलये-दापट येथील तीन बंद घरे फोडून एका घरातून लाखाेंचा ऐवज लंपास केला आहे. त्यात सोन्याच्या दागिन्यांबरोबरच अन्य मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे. या बंद असलेल्या तिन्ही घरांतील कुटुंबीय कामानिमित्त लंडनमध्ये आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दापट येथील आलुलिया रुदु फर्नांडिस यांच्या घराचे प्रवेशद्वार तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला व त्यांच्या घरातील कपाटे व सुटकेस फोडल्या. तेथे चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. परंतु, चोरट्यांनी घरातील किमती दारूच्या बाटल्या लंपास केल्या.
दरम्यान, चोरट्यांनी या घराच्या जवळपास असलेल्या लेलिस डिसिल्वा यांच्या बंद घरात प्रवेश करून लाखो रुपयांचे दागिने लंपास केले. त्याचप्रमाणे याच भागातील नातालिना कोर्त यांच्या घरात शिरून चोरट्यांनी त्यांच्या घरातील कपाटे उघडून सामान अस्ताव्यस्त केले. मात्र, येथेही चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही.
यासंदर्भात येथील माजी पंच सांतान कॉस्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, या तीनही घरांतील कुटुंबीय परदेशात असतात. त्यामुळे चोरट्यांनी त्याचा फायदा घेऊन चोरी केली. दरम्यान, लेलिस डिसिल्वा यांनी आपल्या मुलीच्या विवाहानिमित्त दागिन्यांची खरेदी केली होती. मात्र, लंडनला जाण्यापूर्वी त्यांना बँक लॉकर न मिळाल्याने त्यांनी सदर दागिने घरातच ठेवले होते, असे कॉस्ता यांनी सांगितले. दरम्यान, सावंतवाडा येथेही एका ज्येष्ठ नागरिकांच्या घरात चोरी झाली असून पोलीस तपास सुरू आहे.

हेही वाचा