दिल्लीच्या गोलंदाजांसमोर गुजरात संघाचे लोटांगण

८९ धावांत खुर्दा : मुकेशचे ३ बळी, इशान, स्ट्रब्सचे २ बळी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17th April, 11:34 pm
दिल्लीच्या गोलंदाजांसमोर गुजरात संघाचे लोटांगण

अहमदाबाद : दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सचा संघ आपल्याच जाळ्यात अडकला. संथ खेळपट्टीवर अवघ्या ८९ धावांत गुजरातचा संघ ऑलआऊट झाला. प्रत्युत्तरदाखल दिल्लीने हे आव्हान ६ विकेट आणि ६७ चेंडू राखून सहज पार केले केले. 

दिल्लीकडून जैक फ्रेजर-मैकगर्क याने झटपट २० धावा केल्या, तर शाय होप, अभिषेक पोरेल आणि ऋषभ पंत यांनीही शानदार फलंदाजी केली. गुजरातचा सात सामन्यात हा चौथा पराभव झाला तर दिल्लीने सात सामन्यात तिसऱ्या विजयाची नोंद केली. दिल्लीने नवव्या क्रमांकावरून थेट सहाव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. गुजरातचा संघ सहाव्या क्रमांकावरून सातव्या स्थानावर पोहचला आहे.

गुजरातने दिलेल्या ९० धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने वादळी सुरुवात केली. सलामी फलंदाज जैक फ्रेजर-मैकगर्क याने आपले इरादे स्पष्ट करत षटकाराने सुरुवात केली. जैक फ्रेजर-मैकगर्क  याने गुजरातच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करत दिल्लीला शानदार सुरुवात करून दिली. पण स्पेन्सर जॉन्सन याने जैक फ्रेजर-मैकगर्क  याला बाद करत गुजरातला पहिले यश मिळवून दिले. जैक फ्रेजर-मैकगर्क  याने १० चेंडूमध्ये २० धावांची खेळी केली. यामध्ये दोन षटकार आणि दोन चौकारांचा समावेश होता.  जैक फ्रेजर-मैकगर्क  बाद झाल्यानंतर पृथ्वी शॉही लगेच तंबूत परतला. दिल्लीने लागोपाठ दोन विकेट गमावल्यामुळे सामना रोमांचक होईल, असे वाटत होते. पण शाय होम आणि अभिषेक पोरेल यांनी दिल्लीचा डाव संभाळला. पृथ्वी शॉ याला फक्त सात धावांचे योगदान देता आले. 

सलामी फलंदाज झटपट तंबूत परतल्यानंतरशाय होप आणि अभिषेक पोरेल यांनी हल्लाबोल केला. दोघांनी चौफेर फटकेबाजी केली. दिल्लीने पॉवरप्लेमध्येच आपला विजय निश्चित केला होता. पण दोघेही तंबूत परतले. अभिषेक पोरेल याने सात चेंडूमध्ये १५ धावांची खेळी केली. यामध्ये एक षटकार आणि दोन चौकारांचा समावेश होता. तर शाय होप याने १० चेंडूमध्ये १९ धावांचे योगदान दिले. शाय होप याने दोन षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने १९ धावांची खेळी केली. 

दिल्लीने पहिल्या सहा षटकांमध्येच विजयाकडे आगेकूच केली. फक्त ९० धावांचा बचाव करताना गुजरातकडून प्रतिकार करण्यात आला. पहिल्या सहा षटकामध्ये दिल्लीच्या चार फलंदाजांना तंबूत धाडले होते. दिल्लीने पॉवरप्लेच्या सहा षटकांमध्ये चार विकेटच्या मोबदल्यात ६७ धावा केल्या होत्या. जैक फ्रेजर-मैकगर्क २०, पृथ्वी शॉ ७, अभिषेक पोरेल १५ आणि शाय होप १९ यांनी झटपट धावा काढण्याच्या नादात विकेट फेकल्या. पण कर्णधार ऋषभ पंत आणि सुमितकुमार यांनी दिल्लीला विजय मिळवून दिला.ऋषभ पंत याने ११ चेंडूमध्ये नाबाद १६ धावा केल्या. यामध्ये एक चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. सुमित कुमार याने दोन चौकारांच्या मदतीने ९ धावा केल्या. 

गुजरातकडून संदीप वॉरियर सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने दोन फलंदाजांना तंबूत पाठले. तर राशीद खान आणि स्पेन्सर जॉन्सन यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.

दरम्यान, दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत याने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. दिल्लीच्या गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा निर्णय अचूक ठरवला. दिल्लीच्या गोलंदाजांनी आपल्या धारदार गोलंदाजीने गुजरातचा ‘होम ग्राउंड’मध्ये बाजार उठवला. दिल्लीने गुजरातला ९० धावांच्या आत गुंडाळले. गुजरातला २० षटकेही खेळता आले नाही. दिल्लीने गुजरातला १७.३ षटकांमध्ये ८९ धावांवर ऑलआऊट केले. गुजरातकडून राशिद खान याने सर्वाधिक ३१ धावांची खेळी केली. राशिदने २४ चेंडूत २ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ३१ धावा केल्या. राशिदने केलेल्या या खेळीमुळेच गुजरातला ८० चा आकाडा पार करता आला. राशिदच्या खेळीला वगळले तर गुजरातला ६० धावांपर्यंत पोहचता आले नसते. गुजरातकडून राशिद व्यतिरिक्त साई सुदर्शन याने १२ आणि राहुल तेवतिया याने १० धावा केल्या. राशिद, साई आणि राहुल या तिघांचा अपवाद वगळता गुजरातच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. दिल्लीकडून मुकेश कुमार याने सर्वाधिक ३ बळी घेतले. ईशांत शर्मा आणि ट्रिस्टन स्ट्रब्स या दोघांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. तर खलील अहमद आणि अक्षर पटेलने प्रत्येकी १ बळी घेतला.

गुजरातची निच्चांकी धावसंख्या

गुजरातची याआधी १२५ ही आयपीएलमधील सर्वात निच्चांकी धावसंख्या होती. गुजरातने दिल्ली विरुद्ध १२५ धावा २०२३ साली केल्या होत्या. तर लखनऊ विरुद्ध या १७ व्या हंगामात गुजरातने १३० धावा केल्या होत्या. तर २०२३ मध्ये गुजरातला लखनऊसमोर १३५ धावांपर्यंतच पोहचता आले नव्हते.

हेही वाचा