कर्नाटकसाठी म्हादई हा निवडणुकीचा मुद्दा, मात्र गोव्यासाठी ती जीवनदायिनी

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
17th April, 04:58 pm
कर्नाटकसाठी म्हादई हा निवडणुकीचा मुद्दा, मात्र गोव्यासाठी ती जीवनदायिनी

खानापूर-बेळगाव येथे रोड शोमध्ये सहभागी झालेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व उमेदवार जगदीश शेट्टर.

पणजी : कर्नाटकसाठी म्हादई हा कदाचित निवडणुकीचा मुद्दा असू शकतो. मात्र गोव्यासाठी म्हादई ही जीवनदायिनी आहे, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले. बुधवारी बेळगाव येथे भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा उपस्थित होते. यानंतर डॉ. सावंत यांनी रोड शो मध्ये सहभाग घेतला.

यावेळी मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, गोव्याला पिण्याचे पाणी मिळण्यासाठी, गोव्यातील पर्यावरण जपण्यासाठी, तसेच शेतीसाठी म्हादईचा प्रवाह वाहता राहणे आवश्यक आहे. म्हादई प्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालय, ‘प्रवाह’कडे आहे. याशिवाय आम्ही केंद्र सरकारशीही बोलणी करत आहोत. म्हादई आमच्यासाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. आम्ही म्हादईवरील आमचा हक्क कधीच कमी होऊ देणार नाही.
पक्षाने दिलेल्या जबाबदारीबाबत ते म्हणाले, मला पक्षाने बेळगाव व कारवार येथील जबाबदारी दिली आहे. यंदा कर्नाटकात भाजप आणि एनडीएतील जनता दल आघाडीचे सर्व २८ उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे. जगदीश शेट्टर हे काही काळ दुसऱ्या पक्षात गेले असले तरी आता ते पुन्हा भाजपमध्ये आले आहेत. ते मूळचे भाजपचेच होते. बेळगाव मतदारसंघात त्यांचा लोकसंपर्क चांगला आहे. यावेळी ते निवडून येतील, असा आमचा विश्वास आहे.
चोर्ला घाट रस्त्यासाठी कर्नाटक सरकारने सहकार्य करावे !
मुख्यमंत्री म्हणाले की, गोवा भागात असणारा चोर्ला घाट रस्ता चांगला आहे. मात्र कर्नाटक सीमा सुरू झाल्यावर रस्ता खराब झाला आहे. आधी असलेला रस्ता खणल्याने अधिकच खराब झाला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक खात्यातर्फे येथे दोन लेनचा रस्ता प्रस्तावित आहे. यासाठी कर्नाटक सरकारचे सहकार्य अपेक्षित आहे.

निर्वासित कन्नडिगांचे पुनर्वसन : डॉ. प्रमोद सावंत

न्यायालयाच्या आदेशानुसार गोव्यात कन्नडिगांची घरे रिकामी केली जात आहेत. मात्र अशा निर्वासितांसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत, असे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. बुधवारी उमेदवारी अर्ज सादर करताना त्यांच्यासोबत असलेले बेळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर पत्रकारांशी बोलताना म्हणाले, न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. निर्वासित कन्नडिगांबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या माझ्याशी थेट बोललेले नाहीत.      

हेही वाचा