रेहबर खान खून प्रकरण : प्रेयसीशी लगट करून तिचा छळ केल्याने काढला काटा

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
17th April, 04:34 pm
रेहबर खान खून प्रकरण : प्रेयसीशी लगट करून तिचा छळ केल्याने काढला काटा

म्हापसा : पिळर्ण, पर्वरी येथील ऑडिट भवननजीक मृतावस्थेत सापडलेल्या रेहबर खुर्शिद अली खान (२१ , रा. आल्तो पर्वरी, मूळ उत्तर प्रदेश) याच्या खून प्रकरणी पर्वरी पोलिसांनी पाच जणांना अटक केली. तर मुख्य संशयित आरोपी विकास यादव हा फरार आहे. मयताने फरार संशयिताच्या प्रेयसीशी लगट करून तिची सोशल मिडियावर बदनामी करण्याची धमकी दिल्याच्या रागातून संशयितांनी मयताचा खून केल्याचे पोलीस चौकशीतून उघड झाले आहे. 

 पर्वरी पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांमध्ये खतेश कांदोळकर (कांदोळी), सुमन बरिक (ओर्डा कांदोळी), सचिन सहानी (ओर्डा कांदोळी), तनय कांदोळकर (कांदोळी) व सचिन सिंग (कांदोळी) यांचा समावेश आहे. मयत रेहबर खान हा पर्वरी चोघम रस्त्यावर एका सलूनमध्ये न्हावी म्हणून कामाला होता. या सलूनच्या शेजारीच एकमिनी सुपरमार्केट आहे. त्या मार्केटची मालकीण असलेल्या युवतीशी मयत रेहबर खान याची ओळख झाली होती व तो तिच्या एकतर्फी प्रेमात पडला होता. त्या युवतीचे संशयित आरोपी विकास यादव याच्याबरोबर प्रेमप्रकरण सुरू होते. 

त्या युवतीशी मयत रेहबर हा लगट करून तिचा छळ करू लागला. ही गोष्ट त्या युवतीने प्रियकर विकास यादव याच्या कानी घातली. त्यानंतर विकास यादव याने काही दिवसांपुर्वी मयताला गाठून त्याला मारबडब करीत आपल्या प्रेयसीच्या वाटेला न जाण्याची धमकी दिली होती. तरीही मयताने त्या युवतीचा छळ चालूच ठेवला. आपल्याला भेटायला न आल्यास नग्न फोटो मोर्फ करून सोशल मिडियावर टाकण्याची धमकी दिली होती. मयताने सोमवारी १५ एप्रिलच्या रात्री त्या युवतीला आपल्या खोलीवर यायला सांगितले होते. 

ही गोष्ट त्या युवतीने संशयित प्रियकरला सांगितली. त्यानुसार रेहबरला रात्री पकडून धडा शिकवण्याचा निर्धार संशयित विकास गुप्ता याने केला. त्यानुसार त्याने आपल्या मित्रांना बोलावले. मयत खोलीवर जाताना त्यास वाटेतच संशयितांनी पकडले व कारमध्ये कोंबून घटनास्थळी आणले. तिथे त्याला लाथाबुक्की व  दंडूकांनी जबर मारहाण केली आणि त्यास जखमी अवस्थेत तिथेच टाकून दिले. 

मंगळवारी दि. १६  रोजी पहाटे २ च्या सुमारास मयताचा मृतदेह ऑडिट भवन जवळील रस्त्यावर पोलीस पीसीआर गाडीला आढळला होता. या मयताच्या अंगावर बर्‍याच जखमा होत्या. पण त्याची ओळख पटलेली नव्हती. पर्वरी पोलिसांनी तपासकाम करत मंगळवारी मध्यरात्री मयताची ओळख पटवली.

तसेच बुधवारी सकाळी वरील पाचही संशयितांना ताब्यात घेत. भा.दं.सं.च्या ३०२ कलमानुसार खूनाचा गुन्हा नोंदवून नंतर संशयितांना अटक केली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक विश्वेश कर्पे, निरीक्षक जितेंद्र नाईक व सहकार्‍यांनी २४ तासांच्या आत या खून प्रकरणाचा छडा लावला. पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा