प्रकल्पांबाबत जी भाजपची भूमिका, तीच माझीही भूमिका : पल्लवी धेंपो

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17th April, 01:06 am
प्रकल्पांबाबत जी भाजपची भूमिका, तीच माझीही भूमिका : पल्लवी धेंपो

मडगाव : लोकसभा निवडणुकीत जिंकून आल्यानंतर मी लोकांसाठी अहोरात्र काम करणार आहे. लोकांचे जे प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न असेल. पर्यावरण व विकासकामे एकमेकांसोबत पुढे नेण्यात येतील. भाजपची प्रकल्पांबाबत जी भूमिका असेल तीच माझी असेल, असे भाजपच्या दक्षिण गोवा उमेदवार पल्लवी धेंपो यांनी सांगितले.

दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर धेंपो यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पर्यावरण व विकासाचे प्रकल्पांत ताळमेळ राखून विकासकामे केली जातील, असे स्पष्ट केले. धेंपो यांनी सांगितले की, भाजपच्या राज्यस्तरीय व केंद्रीय नेतृत्वाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणार. विरोधक वारंवार टीका करतात, त्यावर मी कोणताही प्रतिक्रिया देणार नाही. मी प्रचारावर व लोकांच्या गाठीभेटी घेण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. 

दक्षिण गोव्यातील आतापर्यंतच्या प्रचारावेळी लोकांकडून बेरोजगारी, कौशल्यविकास, शिक्षण व महिला सशक्तीकरण या विषयांवर विचारणा होते. मायनिंगबाबत थेट असे कोणी प्रश्न केलेले नाहीत. पण रोजगाराच्या संधी कमी असल्याबाबत विचारणा होते. म्हादईचा विषय हा न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर काहीही बोलणे योग्य नाही. दरम्यान, रेल्वे दुपदरीकरण, कोळसा वाहतूक व प्रकल्पांबाबत भाजपची जी भूमिका असेल तीच माझीही भूमिका असेल. लोकांना मला भेटण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.