मागील ४ निवडणुकीत महिला उमेदवारांच्या पदरी निराशाच

७ महिला उमेदवारांची अनामत रक्कम जप्त

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17th April, 12:50 am
मागील ४ निवडणुकीत महिला उमेदवारांच्या पदरी निराशाच

पणजी : भाजपच्या दक्षिण गोव्याच्या उमेदवार पल्लवी धेंपो यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरला. भाजपाला धेंपो यांच्या विजयाची खात्री आहे. दरम्यान, याआधी गोव्यातून केवळ एकच महिला खासदार निवडून आल्या होत्या. लोकसभा निवडणुकीची आकडेवारी पाहता महिला उमेदवारांच्या पदरी निराशाच आल्याचे स्पष्ट होते. मागील चार लोकसभा निवडणुकीत एकूण सात महिला उमेदवार होत्या. या सातही जणींची अनामत रक्कम जप्त झाली होती.
२००४ च्या लोकसभा निवडणुकीत मुरगाव मतदासंघांतून आवदा व्हीएगस यांनी युजीडीपी पक्षातर्फे निवडणूक लढवली होती. त्यावर्षी मुरगाव मतदासंघांत एकूण २ लाख ९७ हजार ६७८ जणांनी मतदान केले होते. यातील व्हीएगस यांना ५,८८१ मते पडली होती. एकूण मतदानाच्या तुलनेत व्हीएगस यांना पडलेल्या मतांचे प्रमाण १.९८ टक्के होते. यामुळे त्यांची अनामत रक्कम जप्त झाले होते.
२००९ च्या निवडणुकीत उत्तरेतून मार्था डिसोझा तर दक्षिणेतून स्मिता साळुंके यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. उत्तरेत एकूण २ लाख ९२ हजार २९५ मतदान झाले होते. यातील ३,२१७ मते डिसोझा यांना पडली होती. एकूण मतदानाच्या तुलनेत डिसोझा यांना पडलेल्या मतांचे प्रमाण १.१० टक्के होते. द. गोवा मतदासंघांत एकूण २ लाख ७१ हजार ९६० मतदारांनी मतदान केले होते. यातील साळुंके यांना १,७७१ मते (०.६५ टक्के) पडली होती. या निवडणुकीत दोघींची अनामत रक्कम जप्त झाली होती.
२०१९च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर गोव्यात ४ लाख २१ हजार ५७६ मतदान झाले होते. उत्तरेतून अपक्ष लढणाऱ्या ऐश्वर्या साळगावकर यांनी २,१२७ मते एकूण मतदानाच्या तुलनेत साळगावकर यांना पडलेल्या मतांचे प्रमाण ०.५० टक्के होते. तर दक्षिणेतून शिवसेनेतर्फे राखी नाईक यांनी निवडणूक लढवली होती. दक्षिणेत एकूण ४ लाख १९ हजार १३९ जणांनी मतदान केले. नाईक यांना यातील १७६३ (एकूण मतांच्या ०.४२ टक्के) मिळवली होती.
२०१४ च्या निवडणुकीत आपच्या स्वाती केरकर यांनी ११ हजार २४६ मते मिळवली होती. मागील चार लोकसभा निवडणुकीत कोणत्याही महिला उमेदवाराला मिळालेली ही सर्वाधिक मते होती. यावर्षी दक्षिण गोव्यातून अपक्ष लढणाऱ्या व्हिनस हबीब यांना ७९० मते पडली होती.

निवडणूक वर्ष : उमेदवार : मतदासंघ : एकूण मतदान : पडलेली मते
२००४ : आवदा व्हीएगस : मुरगाव : २,९७,६७८ : ५,८८१
२००९ : मार्था डिसोझा : उत्तर गोवा : २,९२,२९५ : ३,२१७
२००९ : स्मिता साळुंके : दक्षिण गोवा: २,७१,९६० : १,७७१
२०१४ : स्वाती केरकर : उत्तर गोवा : ४,०६,०३६ : ११,२४६
२०१४ : व्हिनस हबीब : दक्षिण गोवा: ४,०६,०३६ : ७९०
२०१९: ऐश्वर्या साळगावकर: उत्तर गोवा: ४,२१,५६५ : २,१२७
२०१९ : राखी नाईक : दक्षिण गोवा: ४,१९,१३९ : १,७६३