सत्तरीतील पाटवळ येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई

तळीचे पाणी वापरत असल्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
06th April, 12:23 am
सत्तरीतील पाटवळ येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई

वाळपई : गेल्या चार दिवसांपासून खोतोडा पंचायत क्षेत्रातील पाटवळ या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे या भागातील नागरिकांना तळीच्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. पाणीपुरवठा त्वरित सुरू न झाल्यास तळीच्या पाण्यामुळे या भागातील ग्रामस्थांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पाणीपुरवठा विभागाने याकडे विशेष लक्ष देऊन पिण्याच्या पाण्याची सुविधा तत्काळ उपलब्ध करावी, अशी मागणी या भागातील ग्रामस्थांनी केली आहे. पाटवळ या ठिकाणी पाणी पुरवठा करणारी वाहिनी वारंवारपणे फुटते. सध्या अनेक ठिकाणी भूमिगत वीज वाहिन्या घालण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ठिकठिकाणी रस्ते खोदलेले आहेत. हे रस्ते खोदताना त्या ठिकाणी असलेल्या जलवाहिन्या फोडण्याचे प्रकारही वाढू लागले आहेत. यामुळे अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ लागली आहे. त्याचा फटका पाटवळ गावातील ग्रामस्थांना बसला आहे. चार दिवसांपूर्वी या गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी वाहिनी फुटली व ती दुरुस्त केलेली नाही. यामुळे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा पूर्णपणे बंद झाला आहे.

हेही वाचा