बालपणातली ती‌… चूल

बदल तो हाच ती गवत, चुडतं घालून आग पेटवायची अन् मी भसकन पेट्रोल ओतून. तिच्या‌ जवळ क्षमतेचे भांडवल साचलेले तर माझ्याजवळ त्याचं प्रमाण कमी. आता तर चुलीनेही रुप बदल़लं. कदाचित तिला ही आपल्यात बदल हवाय?!

Story: सय अंगणाची |
29th March, 10:26 pm
बालपणातली ती‌… चूल

आता पायांचा योगा सुरू झाला की आई नुसती पुटपुटते आमच्या काळी डोंगरमाथ्यावर दिवसा दोन-तीन वेळा जाणे, जळणासाठी लाकडं आणणे यातच संपूर्ण शरीराची हालचाल होऊन जायची. या सगळ्या गोष्टी आज काळानुरूप अलिप्त झालेल्या. चूल आणि मी! अगदी लहानपणापासून काहीही समजण्या अगोदर चुलीशी नकळतपणे जोडलं गेलेलं नातं. कधी चुलीतील जळती लाकडं हातात धरण्याचा प्रयत्न, तर कधी जळतं लाकूड हातात धरून 'हाऊ' म्हणून दादाला लावण्याचा प्रयत्न. नंतर चुलीपासून दूर पळण्यासाठी आईकडून पाठीवर हळूवारपणे पडणारा लाटणीचा मार. कामं आटोपल्यावर जळत्या लाकडांवरचा इस्तव पालवला की लाकडावरचा काळसरपणा असलेले लाकूड हातात घेऊन अंगणात मिळेल त्याजागी रांगोळी काढल्यासारखी चित्रं रेखाटायची. आणि पुन्हा आईचा रागाचा पारा चढायचाच. 

किती लहानसहान या गोष्टी ना!आठवण झाल्यावर गम्मत म्हणून‌ हसण्यासारख्याच! तशाच असाव्यात त्या कारण त्या गोष्टी, ती चूल साध्या मातीचीचं, पण भक्कम असलेली. सकाळी लवकर उठून शाळेत जाण्यासाठी ‌आई मुलांना‌ हाक मारुन उठवते परंतु मला याची गरज कधीच भासली‌ नाही, ती कदाचित 'चुली'मुळेच असावी... आई पहाटे लवकर उठून चुलीत योग्यरित्या लाकडं लावून आग पेटवायची. चूलीतील जळलेल्या लाकडांची राख व्यवस्थितपणे काढून ती एखाद्या पिशवीत‌ भरून‌ ठेवायची. नंतर त्या चुलीत नव्याने लाकडं घालण्यात यायची. लाकडं जुनी पटकन जळणारी असली तर ती पेट धरायची, जर नवीन असली तर लाकडातील धूर धुक्यासारखा पसरायचा. अक्षरश: गुदमरायला व्हायचं अन् माझी झोपमोडही. डोळे पुसत पुसत मी रडत आई जवळ जाऊन बसायचे. उजव्या हाताने आई मला कुशीत धरायची, तर डाव्या हाताने बांबुच्या नळीने (दोन्ही बाजूला छिद्र असलेली) लाकडांवर फुंकर घालायची. माझी तर एकसारखी चिडचिड व्हायची त्यावेळेस. आईचा तर तो रोजचा दिनक्रम आणि माझा रोजचा चिडचिडपणा ठरलेलाच. 

चुलीशी तर तिची नाळ जोडलेलीच होती. बांबुच्या नळीने फुंकणे कधी कधी ‌त्रासदायक व्हायचे तिला. पण अनुभवाशिवाय काही गोष्टी समजण्यापलीकडच्या असतात हे मात्र खरं. चुलीभोवती असलेलं 'तिचं' आयुष्यही थकलेलंच असतं काहीवेळा. तरीही पोटाची खळगी भरण्यासाठी चुलीवर शिजवावंच लागतं काही ना काही तरी. कालांतराने सर्वच बदललेलं. आईच्या जागेवर उभे राहण्यासारखा समजूतदारपणा आता माझ्यातही आलेला. आता चुलीशी मीही जोडले गेले. आग पेटली नाही तर माझा चिडचिडेपणा पाहून आई म्हणते, "हो बाजूला मी पाहते." पण ज्यावेळी तिचा चिडचिडेपणा व्हायचा, तेव्हा मात्र तिलाच करावं लागायचं सर्व काही. या गोष्टी आठवताच नकळतपणे मी तिला बाजूला सारते. पण तिचे लक्ष असतेच माझ्यावर. 

चुलीवर ठेवलेलं पातेलं कितीही वाफाळलेलं आणि गरम असलं तरी ती हळुवारपणे उतरवायची. पण माझ्याबाबतीत तसं कधीच होत नाही. हाताला वाफ बसल्यावर पातेलं सरळ चुलीत पडल्याशिवाय राहत नाही. ती वेदना सहन करणारी होती आणि मला त्या सहन न होणाऱ्या हाच काय तो फरक! सणावाराला तर कितीतरी हातांचा स्पर्श एकाच चुलीला व्हायचा. परंतु आज हातही बदलले आणि चुलीही. आहेत काही चुली सदैव पणती सारख्या तेवणाऱ्या त्याच रितीने इस्तवाचा पेट ‌घेणाऱ्या. आता मी सतत चुलीला पाहत राहते मग जाणवते चूल तशीच आहे तिच्यासारखी. चुलीला मातीने किंवा शेणाने सारवले जाते. मग ती नवीन‌ असल्यासारखी वाटते. एकदम आईच्या जागेवर मी! 

बदल तो हाच ती गवत चुडतं घालून आग पेटवायची अन् मी भसकन पेट्रोल ओतून. तिच्या‌ जवळ क्षमतेचे भांडवल साचलेले तर माझ्याजवळ त्याचं प्रमाण कमी. आता तर चुलीनेही रुप बदल़लं. कदाचित तिला ही आपल्यात बदल हवाय?!


ओनिता रामा वरक, पाल-ठाणे‌ सत्तरी गोवा.