योग्य पादत्राणे कशी निवडाल ?

Story: आरोग्य |
29th March, 10:21 pm
योग्य पादत्राणे कशी निवडाल ?

महिलांच्या व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांनी परिधान केलेली पादत्राणे. फक्त गरज म्हणून नाही, तर टापटीप राहण्यासाठी, फॅशनेबल राहण्यासाठी नवनवीन ट्रेण्डनुसार महिला वेगवेगळ्या प्रकारच्या चपला घालतात. पण आपण घालत असलेल्या चपला, हील्स, शूज किंवा सॅण्डल केवळ फॅशनसाठी नसून त्याचा आपल्या शरीरावर व रोजच्या आयुष्यातही परिणाम होत असतो. आपल्या संपूर्ण शरीराचा भार हा आपल्या पायांवर असतो. दिवसभर आपण करत असलेले काम, चालणे, उभे राहणे, चढ-उतर करणे अशा अनेक क्रियांमध्ये महत्त्वपूर्ण असतात ती आपण परिधान केलेली पादत्राणे.


योग्य पादत्राणे का गरजेची?

चपला, शूज किंवा सॅण्डल म्हणजेच पादत्राणे योग्य नसल्यास गुडघ्यांवर, नितंबांवर आणि पाठीच्या खालच्या भागावर दबाव निर्माण होऊ शकतो. यामुळे पायांमध्ये वेदना होऊ शकतात. उंच टाचांची किंवा चुकीची चप्पल घातल्याने आपली चालण्याची पद्धत बदलते. याचा परिणाम शरीराच्या पोश्चरवर होतो. पायांच्या बोटांवर व इतर हाडांच्या सांध्यावर परिणाम होऊन वेदना होऊ शकतात, सांधेदुखीसारखा आजार सुरू होऊ शकतो. बोटांची रचना देखील बिघडू शकते. 

जास्त वेळ चुकीच्या आकाराची म्हणजेच जास्त घट्ट किंवा सैल शूज किंवा सॅण्डल्स घातल्याने नसांवर ताण येऊन पाय जड होणे, सुन्न होणे, सूज येणे, ब्लड क्लॉटिंग यासारख्या समस्या होऊ शकतात. पादत्राणांचा खालचा सोल घट्ट असल्यास, आरामदायक नसल्यास पायाचा तळभाग दुखणे, पायांना खाज येणे, रॅशेस किंवा पाय लाल होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. आपल्यासाठी योग्य पादत्राणाची निवड करताना आरोग्याच्या दृष्टीने पुढील गोष्टी ध्यानात ठेवाव्या.

पायाचे प्रकार

कोणत्याही दोन व्यक्तींचे पाय एक समान नसतात. वेगवेगळ्या रुंदी व लांबीसोबत पायाचे अनेक प्रकार असू शकतात, जसे हाय आर्क, लो आर्क, सपाट पाय (फ्लॅट फीट), अशा वेळेस आपल्या पायाचा प्रकार ओळखून योग्यरित्या आपल्याला उपयुक्त असलेले, किंवा फिजिओथेरपिस्ट, ऑर्डोटीक्स कडून सल्ला घेऊनच पॅडिंग, इनसोल असलेले पादत्राण निवडावे. 

कामाचे स्वरूप

आपली पादत्राणे निवडताना आपली दिनचर्या किंवा काम कशा स्वरूपाचे असते, त्यात खूप चालणे की, बैठे काम असते यावरून निवडावे. जास्त चालणे असल्यास पायाच्या सोलला आधार देणारे, मजबूत पण आरामदायक असणारे शूज वापरणे आवश्यक असते. बैठे कामासाठी आपण आराम आणि शैलीचे संयोजन असलेले पादत्राण निवडू शकतो. कामाच्या ठिकाणी गर्मी असेल किंवा उन्हाळ्यात खास करून कॉटन शूज निवडावे. ज्यातून हवा आत बाहेर झाल्याने ब्लड सर्क्युलेशन नीट होऊन पायांना त्रास होणार नाही. 


टाचांची उंची तपासा 

काही ऑफिसेस मध्ये टाचा असलेले फुटवेअर अनिवार्य असतात. दिवसभर सलग उंच टाचांच्या वापराने पायावर ताण आल्याने त्रास उद्भवू शकतो. तसेच बाहेर असमान पृष्ठभागावर चालण्यास टाचांमुळे त्रास होऊ शकतो. अशा वेळेस टाचांचे फुटवेअर हवेच असतील तर, प्लॅटफॉर्म सोल्स आणि टाचांची दीड इंच किंवा कमी उंची असलेली पादत्राणे वापरावी. 

बोटांकडे अरूंद असलेली पादत्राणे टाळा

पायाच्या पुढील बोटांकडील भाग (टो बॉक्स) घट्ट व अरूंद असलेली फुटवेअर व शूज वापरणे टाळावे. बोट जास्त दाबली जातील किंवा दुमडली जातील अशी पादत्राणे निवडू नये. अशी पादत्राणे दीर्घकाळापर्यंत वापरल्यास बोटांचा आकार बदलू शकतो, पायाला दुखापत होण्याची शक्यता असते. 

आपल्या मापाचे पादत्राणे वापरावे

योग्य पादत्राणे आपले पाय निरोगी ठेवण्यास आणि शरीराला दुखापतीपासून सुरक्षित ठेवण्यास मदत करते. यामुळे आपल्या पायाच्या मापानेच पादत्राणे खरेदी करावी. कारण थोडं लहान किंवा मोठ्या मापाच्या पादत्राणांचा सतत वापर केल्याने देखील पायांना त्रास होऊ शकतो.

पायाच्या समस्यांवर उपाय

पायाच्या काही समस्या स्ट्रेचिंग आणि बळकट करण्याच्या व्यायामाने, वेगळे शूज घालून किंवा पादत्राणांत काही बदल करून सुधारल्या जाऊ शकतात. दीर्घकालीन आणि गुंतागुंतीच्या समस्या - जसे की गंभीर सपाट पाय, हाय आर्क (उंच कमानी), शिन स्प्लिंट्स, अॅकिलीस टेंडन इजा, टर्फ टो - साठी विशेष मूल्यांकन करून मिडीयल आर्क सपोर्ट, इनसोल, हील सपोर्ट शूजच्या आत परिधान करा.

योग्य पादत्राणे तुमचे पाय निरोगी ठेवण्यास मदत करतात, शारीरिक हालचाल सुलभ करतात आणि आपल्या शरीराला दुखापतीपासून सुरक्षित ठेवण्यास मदत करतात.


डॉ. श्वेता राऊत मुळगावकर