हरमलच्या ग्रामस्थाचा प्रामाणिकपणा : पुण्याच्या पर्यटकाला मिळाला हरवलेला आयफोन

Story: वार्ताहर । गोवन वार्ता |
28th March, 10:48 pm
हरमलच्या ग्रामस्थाचा प्रामाणिकपणा : पुण्याच्या पर्यटकाला मिळाला हरवलेला आयफोन


मांद्रे पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक प्रवीण सिमेपुरुषकर यांच्याकडे आयफोन सुपूर्द करताना हरेश मयेकर. सोबत पोलीस अधिकारी सप्लेश नाईक व एलिस्टर डिसोझा.

हरमल : अलीकडे हरवलेल्या वस्तू पुन्हा मूळ मालकाकडे पोहोचवणे दुर्मिळ बनले आहे. प्रामाणिकपणा लुप्त झाल्याचे अनेकदा दिसून येते. मात्र अपवादात्मक स्थितीत काही व्यक्तींकडे प्रामाणिकपणा दिसतो. असाच प्रामाणिकपणा हरमल येथील एका ग्रामस्थाने दाखवून पुण्यातील पर्यटकाचा हरवलेला आयफोन (I Phone) मिळवून दिला.

पोलीस खात्याच्या कारागृह विभागात कार्यरत असणारे हरमल येथील प्रमोद (हरेश) मयेकर हे नेहमीप्रमाणे मंगळवार दि. २६ मार्च रोजी ‘मॉर्निंग वॉक’साठी हरमल (Arambol Beach) किनाऱ्यावर गेले होते. त्यांना किनाऱ्यावरील वाळूत १.३० लाख रुपये किमतीचा आयफोन सापडला. त्यांनी लागलीच मित्राकरवी या आयफोनधारकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडिया स्टेटस, फेसबुक आदी माध्यमातून मूळ मालकाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रयत्न व्यर्थ गेले.

अखेरीस गुरुवार दि. २८ रोजी हा आयफोन प्रमोद मयेकर यांनी मांद्रे पोलीस स्थानकातील उपनिरीक्षक प्रवीण सिमेपुरुषकर यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी आयफोन हरवल्याच्या दोन तक्रारी नोंद झाल्याची माहिती उपनिरीक्षक सिमेपुरूषकर यांनी दिली. या आयफोनचे मालक पुणे येथील असल्याने त्यांना सदर आयफोन मित्राकरवी पत्रव्यवहार करून ताब्यात घेण्यास सांगितले आहे. यावेळी पोलीस निरीक्षक शेरीफ जॅकीस तसेच गावातील नागरिकांनी मयेकर यांच्या प्रामाणिकपणाबद्दल अभिनंदन केले आहे. हरमलचे उपसरपंच अनुपमा मयेकर यांचे ते पती होत.

हेही वाचा