२५ वर्षांत श्रीपाद नाईकांना काँग्रेसकडून केवळ एकदाच कडवी​ लढत!

२००९ मध्ये अवघ्या ६,३५३ मतांनी विजयी; २०१४ मध्ये लाखांपेक्षा अधिक मताधिक्क्याने विजय

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
29th February, 12:18 am
२५ वर्षांत श्रीपाद नाईकांना काँग्रेसकडून केवळ एकदाच कडवी​ लढत!

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक

पणजी : गेल्या पंचवीस वर्षांत केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना केवळ एकाच लोकसभा निवडणुकीत विरोधकाने कडवी लढत दिली. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर गोव्यातून ते केवळ ६,३५३ मतांनी विजयी झालेले होते. काँग्रेस उमेदवार जितेंद्र देशप्रभू यांनी त्यांना कडवी झुंज दिली होती. तर, नाईक एकदाच एक लाखांपेक्षा अधिक मताधिक्क्याने निवडून आलेले आहेत.
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक १९९९ पासून उत्तर गोव्याचे खासदार आहेत. १९९९ पासून आतापर्यंत लोकसभेच्या पाच निवडणुका झाल्या. या पाचही निवडणुकांत भाजपने उत्तर गोव्यातून कायम त्यांनाच संधी दिली आणि नाईक पाचही वेळा निवडून आले. १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत सर्वप्रथम श्रीपाद नाईक यांना उत्तर गोव्याचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले. त्यावेळी त्यांच्याविरोधात काँग्रेसने दिग्गज अॅड. रमाकांत खलप यांना उमेदवारी दिलेली होती. या निवडणुकीत नाईक यांना १,०४,९५८ (५४.९ टक्के) मते मिळाली. तर खलपांना ६८,२३७ (३५.७ टक्के) मते पडली. यावेळी नाईक ३६,७२१ मतांनी विजयी झाले. २००४ च्या निवडणुकीत त्यांच्याविरोधात काँग्रेसकडून विल्फ्रेड डिसोझा उभे होते. त्यावेळी नाईक यांना १,४४,८४२ (५७ टक्के) मते मिळाली. तर, डिसोझांना ८८,६२९ (३४.०९ टक्के) मतांवर समाधान मानावे लागले. यावेळी नाईक यांचा ५६,२१३ मतांनी विजय झाला.
२००९ ची निवडणूक मात्र चुरशीची झाली. यावेळी काँग्रेसने बलाढ्य जितेंद्र देशप्रभू यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत नाईक यांना १,३७,७१६ (४७.१ टक्के) मते पडली. तर देशप्रभूंना १,३१,३६३ (४४.९ टक्के) मते मिळाली. त्यामुळे नाईक यांचा केवळ ६,३५३ मतांनी विजय झाला. या निवडणुकीत कम्युनिस्ट पक्षाकडून ख्रिस्तोफर फोन्सेका आणि मगोकडून पांडुरंग राऊत मैदानात होते. त्याचा फटका त्यावेळी देशप्रभूंना बसला होता.
२०१४ मध्ये मात्र श्रीपाद नाईक तब्बल १,०५,५९९ मतांनी निवडून आले. यावेळी त्यांच्याविरोधात काँग्रेसकडून रवी नाईक मैदानात होते. नाईक यांना २,३७,९०३ (५८.५ टक्के), तर रवी नाईक यांना १,३२,३०४ (३२.५ टक्के) मते मिळाली होती. गत लोकसभा निवडणुकीत त्यांच्याविरोधात काँग्रेसने गिरीश चोडणकर यांना उतरवले होते. या निवडणुकीत नाईक यांना २,४४,८४४ (५७.१ टक्के), तर चोडणकर यांना १,६४,५९७ (३८.४ टक्के) मते मिळाली. त्यामुळे श्रीपाद नाईक यांचा ८०,२४७ मतांनी विजय झाला होता.
२०१४ मध्ये मोदी लाटेचा फायदा
२०१४च्या लोकसभा निवडणुकीत गोव्यासह देशभर मोदी लाट पसरली होती. त्याचा मोठा फायदा देशभरातील अनेक भाजप उमेदवारांना झालेला होता. १९९९ पासून उत्तर गोव्यातील जनतेने कायमच त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. परंतु, २०१४ मध्ये मोदी लाटेमुळे ते प्रथमच एक लाखांपेक्षा अधिक मताधिक्क्याने निवडून आले. तेव्हापासून नाईक केंद्रात मंत्रिपद भूषवत आहेत.

हेही वाचा