मनोजच्या खून प्रकरणातील संशयित निघाला अल्पवयीन

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
28th February, 11:20 pm
मनोजच्या खून प्रकरणातील संशयित निघाला अल्पवयीन

पणजी : ओडीसा येथील मनोज बाग याचा २०२२ मध्ये खून करण्यात आला होता. या प्रकरणातील संशयित सूरज तीर्थ चंदन (ओडीसा) हा अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्याच्या विरोधात ज्युविनल कोर्ट अंतर्गत कारवाई करण्याची आवश्यकता आहे. त्यानुसार वरील प्रकरण प्रधान जिल्हा व सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आले. याबाबतचा आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधिश शबनम शेख यांनी दिला.

या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी १५ मे २०२२ रोजी गुन्हा दाखल केला होता. घर मालक धर्मान्ना मदार यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, फ्रेतसवाडा वेर्ला येथे भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या मनोज बाग याच्यावर कौटुंबिक वादातून हल्ला करण्यात आला होता. या संदर्भात पोलिसांनी चौकशी केली असता, संशयित सूरज तीर्थ चंदन (ओडीसा) याने कौटुंबिक वादातून हा हल्ला करून पळ काढल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तसेच संशयित सूरज चंदन याने पिकासवजा हत्याराने मनोजच्या डोक्यावर वार केला. त्यानंतर मनोजला उपचारासाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात दाखल करण्यात आले होते. तिथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी तत्कालीन पोलीस निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश गडकर यांनी प्रथम प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मनोज याचा मृत्यू झाल्यानंतर खून प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी करून संशयित सूरज तीर्थ चंदन याला ओडीसातून गोव्यात आणून अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी तपास पूर्ण करून संशयित सूरज चंदन याच्या विरोधात म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर हे खून प्रकरण उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आले. 

दरम्यान, घटनेवेळी आपण अल्पवयीन असल्याचा अर्ज संशयित सूरज चंदन याने प्रथमवर्ग न्यायालयात दाखल केला. याची दखल घेऊन न्यायालयाने वैद्यकीय मंडळाला त्याचे वय निश्चित करण्यास सांगितले. त्यानुसार वैद्यकीय अहवाल न्यायालयात सादर केला असता, घटनेवेळी संशयित सूरज तीर्थ चंदन १७ वर्षांचा होता, असा अहवाल सादर केला. त्याची दखल घेऊन न्यायालयाने वरील निर्देश जारी केला आहे. 

हेही वाचा