लक्सरमधला शेवटचा दिवस

तिथून लक्सर टेम्पलच्या दिशेने आम्ही निघालो. लक्झर टेम्पल म्हणजे तेच. नाईल नदीच्या तीरावर असलेलं. ज्याचं प्रतिबिंब काल पाण्याच्या तरंगावर नाचताना पाहिलं होतं. इथे पोहोचेतोवर आकाश अंधारालं होतं.

Story: प्रवास |
17th February, 10:08 pm
लक्सरमधला शेवटचा दिवस

कर्णाक मंदिरातल्या अनेक खांबांवर कोरलेले हायरोग्लाफ्स वाचत बसले असते तर नक्की एक आठवडा तरी लागला असता. हे भव्य मंदिर पाहायलाच वेळ अपुरा पडत होता. ह्या पुढे आम्हाला लक्सर टेम्पल सुद्धा गाठायचं होतं. पण तरीही आग्रहाने मारियाने आम्हाला देवळाच्या आवारात असलेल्या ‘मन्नत पिलर’ कडे नेलं. इजिप्शियन ह्या खांबाला मन्नत म्हणतात कारण ह्या खांबाभोवती सात प्रदक्षिणा घातल्याने मनातली इच्छा पूर्ण होते. आम्ही चौघांनी प्रत्येकी सात प्रदक्षिणा घातल्या आणि मनातल्या मनात काहीतरी मागितलं. 


तिथून लक्सर टेम्पलच्या दिशेने आम्ही निघालो. लक्झर टेम्पल म्हणजे तेच. नाईल नदीच्या तीरावर असलेलं. ज्याचं प्रतिबिंब काल पाण्याच्या तरंगावर नाचताना पाहिलं होतं. इथे पोहोचेतोवर आकाश अंधारालं होतं. लक्झर देवळावर परत एकदा रोषणाईचे दागिने चढवले गेले होते. त्यांच्या प्रकाशात चमचमणारं देऊळ किती मोहक दिसत होतं. देवळाबाहेर प्रवेशद्वारी सहा मोठे पुतळे होते. आतल्या फॅरोंचं जणू ते रक्षण करत होते. मी मारियाला तसं विचारलं. ती म्हणाली ह्या देवळात देव नाही. फॅरो नाही. हे फक्त एक पवित्र स्थान आहे.

तिच्या म्हणण्याप्रमाणे लक्सर मंदिर हे कोणत्याही देवाला समर्पित नाही किंवा मृत फारोंची आराधना करण्यासाठी बांधलं गेलं नाही. ते इजिप्त मधल्या राजवटीच्या प्रस्थापनेसाठी, तिथल्या नव्या राजाला राजाचा दर्जा देण्यासाठी बांधलं गेलं होतं. इजिप्तच्या अनेक फॅरोंना राज्याभिषेक करण्याच्या हेतूने बांधलेलं एक पवित्र स्थान. म्हणजे इथे ह्या पवित्रं ठिकाणी राज्याभिषेक झाल्याशिवाय त्यांना राजाचा दर्जा मिळत नसे. राज्य प्राप्त होत नसे. 

आम्ही देऊळ बघायला आत गेलो. इथे सुद्धा भरपूर खांब होते. ह्यांवर देखील हायरोग्लाफ्स. इजिप्शियन लोक आपली कथा, संस्कृती ह्या सुंदर भाषेत महत्त्वाच्या ठिकाणी कोरून ठेवत. मारियाने आम्हाला काही चिन्हं नि त्यांचे अर्थ सांगितले. काही वेळानंतर ते मी विसरूनही गेले. पण ही भाषा शिकायला आवडेल मला. प्राणी, पक्षी, झाडं, ढग, आग असे निसर्गातले घटक घेऊन बनावलेली भाषा पाहायला फार सुंदर. ती ह्या देवळांची शोभा वाढवतच होती. 


हे खांब जवळून पाहून, मारियाने शिकवलेली चिन्हं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत आम्ही पुढे निघालो. देऊळ बंद व्हायची वेळ झाली होती. पण इथून निघवत नव्हतं. आम्ही उशिरा पोहोचल्याने ही भेट अर्धवट झाल्यागत वाटली. वेळ अपुरी पडली होती आणि अखेर आम्हाला निघावं लागलंच. परतीच्या वाटेवर मारियाने आमचा निरोप घेतला, तो परत इथे यायचा आग्रह करून. कदाचित तिला देखील मनाप्रमाणे निवांत हे देऊळ आम्हाला दाखवायला मिळालं नव्हतं. तिला परतण्याचं आश्वासन देत आम्ही निघालो. 

हा आमचा लक्झर मधला शेवटचा दिवस होता. हे शहर सोडून जाताना वाईट वाटत होतं. कदाचित त्याचमुळे भूकही मेली होती. शिवाय रूमवर जाऊन सामानाची आवराआवर करायचं शिल्लक राहिलं होतं. डोक्यात त्याचं देखील टेन्शन होतंच! आम्ही झपाझप पाय टाकत आमची व्हॅन गाठली. ड्रायव्हरला गाडी सरळ हॉटेलला घ्यायला सांगितली. उद्या आमचं मुक्काम पोस्ट ‘कायरो’! आणि त्यासाठी आम्ही सरळ रूमवर जाऊन पॅकिंगचा जिम्मा हाती घेतला.

क्रमशः


भक्ती सरदेसाई