आणखी तीन रत्नांचा सन्मान

आज पंतप्रधान मोदी देशाला आर्थिक महाशक्ती बनविण्याचा निर्धार करीत असले तरी त्याचा पाया नरसिंह राव यांनी घातला होता, त्याचे विस्मरण विद्यमान केंद्र सरकारला झाले नसेल, म्हणूनच आता त्यांचा उशिरा का होईना, ‘भारतरत्न’ने सन्मान करण्याचे सरकारने ठरविले असेल.


09th February, 10:26 pm
आणखी तीन रत्नांचा सन्मान

देशातील सर्वच क्षेत्रांमधील सर्वोत्कृष्टता आणि पात्रता यांचा विचार करून केंद्र सरकारने यंदा पाच महनीय व्यक्तींना ‘भारतरत्न’ किताब जाहीर केल्याचे दिसून येते. बिहारमधील सामान्यांचे तारणहार म्हणून गणले गेलेले कर्पुरी ठाकूर यांचे नाव प्रथम जाहीर झाले, त्यावेळी गरीब, कष्टकऱ्यांचा सन्मान झाल्याचे मानण्यात आले. काही जणांना त्यावेळी ती राजकीय चाल वाटली, अर्थात कर्पुरी ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली घडलेल्या नव्या पिढीतील नेत्यांना हा आपला गौरव वाटला. त्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘भारतरत्न’ देण्याचे घोषित केले, त्यावेळी आपल्या कर्तबगारीने उपपंतप्रधानपद भूषविलेल्या आणि नेहमीच भाजपमध्ये समर्थ सारथ्याची भूमिका बजावलेल्या सक्षम नेत्याला सन्मानित करण्यात आल्याची प्रतिक्रिया व्यक्त झाली. मोदी सरकार नेहमीच अनपेक्षित निर्णय घेत आले आहे, त्यानुसार शुक्रवारी आणखी तीन नावे ‘भारतरत्न’साठी जाहीर झाली, ज्यात पी. व्ही. नरसिंह राव, चरण सिंग आणि एम. एस. स्वाभिनाथन यांचा समावेश आहे. ज्यावेळी माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांना २०१९ साली मोदी सरकारने ‘भारतरत्न’ देण्याची घोषणा केली, त्यावेळी पहिला धक्का काँग्रेसला बसला होता. विरोधकांच्या प्रमुख नेत्याला अशा प्रकारे केंद्र सरकारने सन्मानित करण्याची ही कृती तशी त्या पक्षाला धक्कादायक वाटणे साहजिक होते. कधीकाळी प्रणव मुखर्जी यांचे नाव पंतप्रधानपदासाठी चर्चेत होते, पण त्यांना पक्षातर्फे डावलण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर अशाच प्रकारे पी. व्ही. नरसिंह राव यांनी १९९१ ते १९९६ सालापर्यंत पंतप्रधानपद भूषविले असतानाही त्यांचा गौरवाने उल्लेख करण्याचे त्यांच्याच काँग्रेस पक्षाने टाळले. नरसिंह राव यांच्या कन्या सुरभी वाणी देवी या तेलंगणमधील विधान परिषदेत भारत राष्ट्र समितीच्या आमदार आहेत, तर त्यांचे नातू एन. व्ही. सुभाष हे भाजपचे सदस्य आहेत, या दोघांनी आतापर्यंत नरसिंह राव यांची काँग्रेस पक्षाने सतत उपेक्षा केल्याचे म्हटले आहे. वेगवान आर्थिक सुधारणांद्वारे भारताला जागतिक पातळीवर आर्थिक शक्ती बनविण्याचे पहिले पाऊल टाकून देशाला जागतिक बाजारपेठेत मानाचे स्थान मिळवून देण्याचे काम नरसिंह राव यांनी आपल्या कालावधीत केले होते. उद्योग क्षेत्राला अडसर ठरणारे ‘लायसन्स राज’ हटवले होते. आज पंतप्रधान मोदी देशाला आर्थिक महाशक्ती बनविण्याचा निर्धार करीत असले तरी त्याचा पाया नरसिंह राव यांनी घातला होता, त्याचे विस्मरण विद्यमान केंद्र सरकारला झाले नसेल, म्हणूनच आता त्यांचा उशिरा का होईना, ‘भारतरत्न’ने सन्मान करण्याचे सरकारने ठरविले असेल.

ज्येष्ठ शेतकरी नेते आणि देशाचे पाचवे पंतप्रधान म्हणून जुलै १९८७ ते जानेवारी १९८० असा अल्पकाल जबाबदारी सांभाळलेले चरण सिंग यांना ‘भारतरत्न’ देण्याने देशातील समस्त शेतकरीवर्गाचा गौरव झाला आहे, अशी प्रतिक्रिया सपा नेते अखिलेश यादव यांनी व्यक्त केली आहे, जी सार्थ म्हणता येईल. कृषी सुधारणा घडवून आणण्यासाठी सतत धडपड केलेले नेते अशी चरण सिंग यांची प्रतिमा देशात होती. उपलब्ध साधनांची योग्य वाटणी आणि शेतकऱ्यांचे हीत याचाच विचार त्यांनी जीवनभर केला होता. त्यामुळे ते देश पातळीवर शेतकरी नेता म्हणूनच परिचित होते. ज्या बिगरराजकीय व्यक्तीला हा बहुमान प्राप्त झाला आहे, ते एम. एस. स्वामीनाथन यांना देशातील हरित क्रांतीचे प्रणेते मानले जाते. देशात अनेक वर्षे अन्नधान्याची टंचाई भासत असताना, स्वामीनाथन यांनी आपल्या संशोधनाच्या माध्यमातून अशा लागवडीला प्रोत्साहन दिले की, ज्यामुळे देश याबाबत स्वयंपूर्ण झाला. त्यांची कीर्ती जगभरात झालीच, शिवाय त्यांना देशपरदेशांत सन्मान प्राप्त झाला होता.

लोकसभा निवडणुका जवळ येऊन ठेपल्या असताना, अशा प्रकारे मोदी सरकारने काही व्यक्तींना देशाचा सर्वोच्च सन्मान देण्याचा निर्णय जाहीर केल्याने याला राजकीय किनार लाभली आहे. यामागे भाजपची राजकीय रणनीती आहे, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत असल्या तरी रत्नांची ही पंचमी हा वादाचा विषय होऊ शकत नाही. या सन्मान लाभलेल्या व्यक्ती पात्र आहेत, सन्माननीय आहेत, यात शंका नाही. नरसिंह राव, चरण सिंग अथवा कर्पुरी ठाकूर यांचे पक्ष वेगळे असले तरी त्यांचे योगदान दखल घेण्यासारखे असल्याने त्यांचा गौरव होणे ही समाधानाची बाब आहे.