राज्यात दिवसाला सरासरी ६८ जणांना कुत्र्यांचा चावा

सरकारी इस्पिळातील आकडेवारी

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
08th February, 12:35 am
राज्यात दिवसाला सरासरी ६८ जणांना कुत्र्यांचा चावा

पणजी : राज्यात २०२२ आणि २०२३ या दोन वर्षांत कुत्रा चावण्याच्या तब्बल ४९ हजार ६७२ घटनांची नोंद झाली आहे. याचाच अर्थ दिवसाला सरासरी ६८ घटनांची नोंद झाली आहे. ही आकडेवारी केवळ सरकारी इस्पितळातील आहे. विधानसभेत पशुसंवर्धन मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी लेखी उत्तराद्वारे ही माहिती दिली. या विषयी आमदार प्रवीण आर्लेकर यांनी अतारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
लेखी उत्तरानुसार, २०२२ मध्ये राज्यात कुत्रे चावण्याच्या तब्बल २४ हजार ७५१ घटनांची नोंद झाली होती, तर २०२३ मध्ये २४ हजार ८१५ घटनांची नोंद झाली. दोन वर्षांत दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात कुत्रे चावण्याच्या सर्वाधिक ५,३०९ घटनांची नोंद झाली होती. त्या खालोखाल कांदोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ४६२०, तर उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात ४,५९६ घटनांची नोंद झाली.
गेल्या दोन वर्षांत पणजी नागरी आरोग्य केंद्रात कुत्रे चावण्याच्या ३,८१५ घटनांची नोंद झाली. चिखली उपजिल्हा इस्पितळात ३,५९४, मडगाव आरोग्य केंद्रात ३,३९१, तुये प्राथमिक आरोग्य केंद्रात २,२१४, काणकोण आरोग्य केंद्रात २,०५७, धारबांदोडा येथे १,५६५, साखळीत १,५८३, बाळ्ळी येथे १,५५८, केपेत १,४५९ कुत्रे चावण्याची घटनांची नोंद झाली.      

हेही वाचा