आमदारांविरोधात अपात्रता याचिका; सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
02nd December 2023, 11:24 pm
आमदारांविरोधात अपात्रता याचिका; सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी

पणजी : काँग्रेसच्या आठ फुटीर आमदारां​विरोधात माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर ४ डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयात गेल्यावेळी झालेल्या सुनावणीत फुटीर आठही आमदारांसह सभापती रमेश तवडकर यांना डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत म्हणणे मांडण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. राज्य विधानसभा निवडणूक झाल्यानंतर सहा महिन्यांनी १४ सप्टेंबर २०२२ रोजी काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आलेल्या तत्कालीन विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांच्यासह दिगंबर कामत, आलेक्स सिक्वेरा, संकल्प आमोणकर, डिलायला लोबो, केदार नाईक, राजेश फळदेसाई आणि रुडॉल्फ फर्नांडिस या आठ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्याविरोधात गिरीश चोडणकर यांनी ११ नोव्हेंबर २०२२ रोजी सभापतींकडे अपात्रता याचिका दाखल केली होती. अनेक महिने सभापतींनी या याचिकेवर सुनावणी न घेतल्याने चोडणकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन सभापतींना अपात्रता याचिकेवरील सुनावणी लवकर घेण्याचे निर्देश जारी करण्याची मागणी केली होती. परंतु, सुनावण्यांनंतर उच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश न देता चोडणकर यांची याचिका निकालात काढली होती. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्याचा संदर्भ देत सभापतीपद हे लवाद असल्यामुळे न्यायालय हस्तक्षेप करू शकत नसल्याचे निरीक्षणही उच्च न्यायालयाने नोंदवले होते. त्यामुळे चोडणकर याविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत.