ताईच्या हातची पोळी

Story: छान छान गोष्ट |
03rd December 2023, 03:23 am
ताईच्या हातची पोळी

छगनला साजूक तुप लावलेली गरमागरम पोळी फार आवडायची. पोळीवरती साखर पेरून दिली की छगनची मजाच मजा. म्हणजे त्याला तर वाटायचं, पोटाला फुग्यासारखं फुगवता आलं तर दोन अधिकच्या तुपसाखरपोळ्या त्यात आरामात बसतील. तुपसाखरपोळी सदोदित खाऊन छगनने चांगलच बाळसं धरलं होतं. आजी तर छगनला लाडाने छगनशेठ म्हणायची.

एकदा काय झालं,  छगनच्या आईची मान दुखू लागली. तिला हातानेही कोणतेच काम करता येईना. डॉक्टर म्हणाले, "तुम्हाला विश्रांतीची फार गरज आहे." छगनचा पक्यामामा येऊन छगनच्या आईला माहेरी घेऊन गेला. छगनचे बाबा तर दौऱ्यावर गेले होते. घरी राहिले, छगन, आजी नि छगनपेक्षा चार वर्ष मोठी असलेली त्याची कमुताई. 

कमुताईने आजीच्या सूचनेनुसार भाताला आधण ठेवलं. तांदूळ वैरले. पिवळंधम्म वरण केलं. एवढ्यानच कमूताई दमली. मग आजीने दुखऱ्या गुडघ्यांवर दाब देत, कसंबसं बेसनाचं पिठलं केलं. जेवायला पानं घेतली. आजी म्हणाली, "चला छगनशेठ जेवायला बसा." कसचं काय, छगनशेठ पुरीसारखा टम्म फुगला. कमूताई म्हणाली, "अरे झालं काय एवढं फुगायला?" छगन म्हणाला, "आम्हाला तुपसाखरपोळी पाहिजे. बेसनपिठलं नकोच मुळी." आजीला कसंसच वाटलं. तिच्याच्याने जमलं असतं तर तिने जरूर पोळ्या केल्या असत्या.

शेवटी लाडक्या चिडक्या भाऊरायासाठी कमूताई बसली कणिक तिंबायला. थोडं पीठ, थोडं पाणी आणिक थोडं पीठ, थोडं अजून पाणी म्हणता म्हणता कमूताईचा अंदाज चुकला नि दोनाऐवजी दहा चपात्यांचं कणिक एकदाचं तिंबलं गेलं. छगनने गोळे बनवून दिले नि कमूताईने पोळपाटावर पीठ पेरून एकेक गोळा लाटला, 

एकही पोळी धड येईना. आजीने नातीस सावरून घेतलं, "शाब्बास माझ्या नातीची. भावासाठी पोळ्या केल्यान. होईनात नकाशे जगभराचे पण मायेचे आहेत हो!" कच्च्यापक्क्या नकाशावजा पोळ्या करताना कमूताईचा हातही पोळला. मग मात्र छगनला वाईट वाटलं. कमूताईला म्हणाला, "उद्यापासून वरणभातच खाईन मी, आई येईस्तोवर. तू नको आई नसताना पोळ्या करूस ताई." नि त्यानेच ताईच्या पोळलेल्या त्वचेला गुलाबी अम्रुतमलम लावलं.

तुपसाखरपोळी घेऊन खायला बसला तर आईचा फोन. "छगन, बाळ जेवलास नं!" "हो आई, आज किनई कमूताईने पोळ्या केल्यात. तुझ्यासारख्या चांदोबा झाल्या नाहीत पण तरी मला खूप खूप आवडल्या. कमूताईला सांगितलय मी की उद्यापासून वरण, आमटीभातच बनव. शहाणा आहे नं मी आई!"

"माझं शहाणं बाळ ते. तुझ्या जीवावर आजी नि ताईला सोडून आलेय. काळजी घे हो त्यांची." असं म्हणताच छगनशेठला आपण खूप मोठं झाल्यासारखं वाटलं. तो ऐटीत म्हणाला, "हो हो आई, तू इथली मुळीच काळजी करू नको. मी आहे नं इथे."

छगनच्या त्या तोऱ्याकडे पाहून आजी नि कमूताई खुदूखुदू हसल्या.


गीता गरुड