दीपस्तंभ : ब्रम्हकरमळी गावाच्या एकजुटीचा नवीन पायंडा

सत्तरी तालुक्यातील ब्रह्मदेवाचा आशीर्वाद लाभलेल्या व सृष्टी निर्माता ब्रह्मदेव याची छाया असलेल्या ब्रह्मकरमळी या गावात ग्रामस्थांच्या सहयोगाने व समर्पित भावनेतून दीपस्तंभ उभारण्यात आलेला आहे. दीपस्तंभाप्रमाणे या गावातील लोकांचे विचार हे खरोखरच समाजासाठी एक वेगळ्या प्रकारचा आदर्श निर्माण करून देणारे ठरू लागले आहेत.

Story: प्रासंगिक |
03rd December 2023, 03:16 am
दीपस्तंभ : ब्रम्हकरमळी गावाच्या एकजुटीचा नवीन पायंडा
  • 'माझा गाव माझी संकल्पना' या संदर्भात आता ग्रामीण भागातील नागरिकांचे विचार बदलू लागलेले आहेत. माझा गाव सुंदर कसा होणार? माझ्या गावाची परंपरा अबाधित कशी राहणार? त्यावर कुणाचीही वक्रदृष्टी पडणार नाही, बदलत्या जीवनशैलीचा प्रतिकूल परिणाम आपल्या गावाच्या परंपरा व विकासावर होणार नाही याची विशेष काळजी घेण्याचे विचार आज प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण होऊ लागलेले आहेत. चांगल्या प्रकारच्या संकल्पना राबविण्याची क्षमता आज ग्रामीण भागाच्या जनतेच्या मनात घर करून बसू लागली आहे ही खरोखर आनंदाची बाब आहे. 

सत्तरी तालुक्यातील ब्रह्मदेवाचा आशीर्वाद लाभलेल्या व सृष्टी निर्माता ब्रह्मदेवाची छाया असलेल्या ब्रह्मकरमळी गावात तिथल्या ग्रामस्थांच्या सहयोगाने व समर्पित भावनेतून दीपस्तंभ उभारण्यात आलेला आहे. या दीपस्तंभाच्या माध्यमातून गावातील विचारांचे दीप प्रज्वलित होऊ लागले आहेत. दीपस्तंभाप्रमाणे या गावातील लोकांचे विचार हे खरोखरच समाजासाठी एक वेगळ्या प्रकारचा आदर्श निर्माण करून देणारे ठरू लागले आहेत. 

सत्तरी तालुक्यातील ब्रह्मकरमळी येथील ब्रह्मदेव देवस्थानाच्या माध्यमातून या गावाला विशिष्ट अशी ओळख निर्माण झालेली आहे. ब्रह्मदेवाचे ब्रह्मदेव गाव अशी ओळख निर्माण झाल्यानंतर या गावाला विशिष्ट असे महत्त्व प्राप्त होऊ लागलेली आहे. या गावांमध्ये डिसेंबर महिन्यामध्ये साजरा करण्यात येत असलेल्या ब्रह्मोत्सवाच्या माध्यमातून हजारो भाविक या देवस्थानामध्ये देवदर्शनचा लाभ घेत असतात.

ब्रह्मदेव हा सृष्टीचा निर्माता आहे. त्यांच्या आशीर्वादाने समाज चालत आहे. अशी भाविकांची श्रद्धा असल्याने ब्रह्मोत्सवाच्या माध्यमातून देवदर्शनाचा लाभ घेण्याची संधी भाविकांना उपलब्ध होत असते. ब्रह्मोत्सव हा तीन दिवसाचा एक प्रकारचा भक्तीचा आनंद सोहळा असतो. यामुळे गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक त्याचप्रमाणे देशाच्या इतर भागातूनही मोठ्या प्रमाणात भाविक या गावांमध्ये भेट देऊन या आनंद सोहळ्याच्या भक्तीत चिंब होत असतात. 

प्रत्येक गावामध्ये जत्रा कालोत्सव असे वेगवेगळ्या प्रकारचे परंपरागत सण साजरे करण्यात येत असतात‌‌ मात्र ब्रह्मकरमळी येथील गावातील नागरिकांची एकजूट ही खरोखर वाखणण्याजोगी आहे. प्रत्येक सार्वजनिक गोष्ट एकजुटीच्या वज्रमुठीवर यशस्वी होत असते हे आतापर्यंत या गावातील नागरिकांनी व ग्रामस्थांनी दाखवून दिलेले आहे. ब्रह्मदेवाच्या प्रांगणात सुशोभीकरण व्हावे व दीपस्तंभ उभा राहावा. या दीपस्तंभाप्रमाणे येणाऱ्या पिढीच्या विचाराने उंच भरारी घ्यावी अशा नव्या संकल्पनेतून दीपस्तंभ उभारण्याची संकल्पना निर्माण झाली. 

हा दीपस्तंभ उभारण्यासाठी लागणारा खर्च उभा कसा करावा? अशा प्रकारचे विचारमंथन सुरू झाल्यानंतर प्रत्येकाने आपल्या हृदयातून या दीपस्तंभाप्रमाणे विचार प्रवाहित करून दान करण्याची तयारी दर्शविली. पाहता पाहता दहा लाख रुपयाचा निधी कधी उभा राहिला हे समजलेच नाही. या दहा लाख रुपयांचा निधी खर्च करून दीपस्तंभ ब्रह्मदेव देवस्थानमध्ये नवी संकल्पना, नवे विचार, नवा अध्याय, नवी ऊर्जा, नवी आपुलकी, नवी भक्ती अशातून उभा राहिलेला आहे. यामुळे या गावाला एक विशिष्ट अशी ओळख आता निर्माण झालेली आहे. 

या दीपस्तंभाचा शुभारंभ नुकताच त्रिपुरारी पौर्णिमेच्या माध्यमातून करण्यात आला. या गावांमध्ये वास्तव्यास असलेल्या प्रत्येक भाविकांच्या घरातून आलेला दीप या दीपस्तंभाला प्रज्वलित करून याचा सुंदर पद्धतीने शुभारंभ करण्यात आला. धार्मिक व पारंपरिक पद्धतीने याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात गावातील ग्रामस्थ व भाविकांची उपस्थिती होती.

प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प भाविकांच्या व नागरिकांच्या बळावर उभे राहत असले तरी या ठिकाणी उभारण्यात आलेला दीपस्तंभ म्हणजे येणाऱ्या पिढीसाठी वेगळ्या प्रकारचे उदाहरण आहे. असे म्हणतात की, भावी पिढी ही वर्तमान पिढीच्या पायावर पाय देऊन चालत असते. यामुळे आपण चांगल्या प्रकारचे आदर्श निर्माण करून यशस्वी ठरल्यास त्याच पद्धतीचे आदर्श भावी पिढी निर्माण करू शकते. यामुळे ब्रह्मकरमळी येथील गावातील नागरिकांनी व भाविकांनी घातलेला एक चांगला पायंडा येणाऱ्या काळात याच गावातील भावी पिढीसाठी एक आदर्श असा पायंडा असू शकेल. 

त्याचप्रमाणे या गावातील नागरिकांच्या आदर्श इतर गावातील नागरिकांसाठी प्रोत्साहित ठरू शकणार आहे. सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे प्रत्येक गावामध्ये आज वैचारिक शक्तीच्या आधारावर वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक प्रकल्प उभे राहू लागलेले आहेत. मात्र ब्रह्मकरमळी येथील गावांमध्ये उभा राहिलेला दीपस्तंभ हा वेगळ्या प्रकारचा आदर्श निर्माण करणारा निश्चितच आहे. कारण याला सरकारच्या निधीचा कोणताही आधार प्राप्त झालेला नाही. प्रत्येकाच्या खिशातून व प्रत्येकाच्या कष्टाच्या बळावर हा दीपस्तंभ उभा राहिलेला आहे. यामुळे सरकारी खर्चाच्या पेक्षाही याला अनन्यसाधारण महत्त्व आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही.

निसर्गाचा सुंदर नजराणा लाभलेल्या या गावांमध्ये शेती बागायतीची श्रीमंती लाभलेली आहे. सर्वसामान्य जनता या गावांमध्ये राहत आहेत. मात्र आपला गाव कसा आदर्श व्हावा अशा प्रकारचे विचारधारा हीच या गावाची खरी श्रीमंती म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मतभेद कुठलेही असोत मात्र गावाच्या विकासाच्या कक्षा या समाजाप्रेरित व समाजाभिमुख असायला हव्यात अशा प्रकारची विचारधारा बाळगणारा व त्याची अंमलबजावणी करणारा नागरिकांचा घटक या गावांमध्ये वास्तव्यास आहे ही खरोखरच इतर गावाच्या बाबतीत आदर्श ठरणारी गोष्ट आहे.

ब्रह्मकरमळी येथील ब्रह्मदेवाला असलेले अनन्यसाधारण महत्त्व व गावाच्या एकजुटीच्या प्रबळ बळावर या गावाची निर्माण झालेली अस्मिता पाहिल्यास याचे सर्व श्रेय या गावातील ग्रामस्थांना व भाविकांना जाते. तसे पाहावयास गेलो तर प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारची देवस्थाने आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे आदर्श आहेत. मात्र जोपर्यंत हे आदर्श या देवस्थानाला गावातील नागरिक,भाविक अनन्यसाधारण महत्त्व देऊन ते जनतेसमोर आणत नाही तोपर्यंत त्या गावाची विशिष्ट अशी ओळख निर्माण होऊ शकत नाही. यामुळे दीपस्तंभामुळे ब्रह्मकरमळी येथील ब्रह्मदेवाच्या सध्याच्या परिसराला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे.

या गावाच्या विचारांचा आदर्श, या गावाच्या विकासाचा आदर्श, या गावाच्या एकजुटीचा आदर्श, प्रत्येकाने घेणे अत्यंत गरजेचे आहे. दीपस्तंभ हा जरी वेगळ्या प्रकारचा प्रकल्प असला तरी सुद्धा हा प्रकल्प उभारण्यामागची त्यांची असलेली विचारधारा त्याला सलाम करावेसे वाटते. कारण अशा प्रकल्पाच्या माध्यमातून गावाच्या एकजुटीची वज्रमूठ मजबूत होत असते. गावाच्या विकासाच्या कक्षा याच एकजुटीच्या बळावर विस्तारित होत असतात. यामुळे प्रत्येकाने या गावाचा आदर्श घेण्यासारखी ही बाब आहे. येणाऱ्या प्रत्येक पारंपरिक, धार्मिक सणाला दीपस्तंभ प्रज्वलित होणार आहे. प्रत्येक घरातून येणारी दिव्याची वात या गावाच्या विकासाचा नवा हुंकार निर्माण करण्यासाठी यशस्वी ठरले हे नव्याने सांगण्याची गरज नाही. दीपस्तंभाप्रमाणे प्रज्वलित होणारी वात ही प्रत्येकाच्या मनामध्ये, हृदयामध्ये, तनामध्ये, विचारांमध्ये नवा हुंकार निर्माण करणारी निश्चितच ठरेल यात अजिबात शंका नाही.


  • उदय सावंत
  • वाळपई