पेडणेच्या आमदारांना अध्यक्षपद द्या, अन्यथा पीडीएच रद्द करा!

राजन कोरगावकर, अमित सावंत यांची मागणी

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
21st November, 12:06 am
पेडणेच्या आमदारांना अध्यक्षपद द्या, अन्यथा पीडीएच रद्द करा!

पत्रकार परिषदेत बोलताना राजन कोरगावकर. सोबत ॲड. अमित सावंत (निवृत्ती शिरोडकर)

पेडणे : पेडणे तालुक्यातील मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट मोपा या परिसरात सरकारने पीडीए (नियोजन आणि विकास प्राधिकरण) जाहीर केले आहे. त्या पीडीएच्या चेअरमनपदी स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर यांची नियुक्ती करावी. अन्यथा आर्लेकर यांनी हस्तकला महामंडळाचा चेअरमनपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर आणि मांद्रेचे सरपंच अॅड. अमित सावंत यांनी पेडणे येथे पत्रकार परिषदेत केली.
कोरगावकर यांनी सांगितले की, गोव्यात अनेक ठिकाणी पीडीए आहे. परंतु त्या पीडीएवर स्थानिक आमदार किंवा स्थानिक नागरिक, अधिकारी चेअरमनपदी असतो. मात्र मोपा पीडीए लागू केल्यानंतर स्थानिक आमदाराला स्थान दिले गेले नाही. शिवाय ज्या पंचायतींचा पीडीएत समावेश केला आहे, त्या पंचायतींच्या सरपंचांनाही त्या पीडीएमध्ये घेतलेले नाही. हा पेडणेकरांवर झालेला अन्याय आहे.
अॅड. अमित सावंत यांनी सांगितले की, पीडीए तयार करत असताना स्थानिक पंचायतींना विश्वासात घेतलेले नाही. सरकारने त्या पंचायतींना विश्वासात घेऊनच पीडीए स्थापन करायची आवश्यकता होती. मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावे. पीडीएमुळे पंचायतींना कशा प्रकारचे नुकसान होणार, याबाबत पाचही पंचायत क्षेत्रामध्ये जाऊन चर्चा करणार आहोत.