आज मला हे लेखनाचे कौशल्य लाभले हे माझे भाग्यच आहे आणि माझे हे भाग्य फुलवणारी व्यक्ती म्हणजे माझे बाबा.
मला आजही अगदी ठळकपणे आठवते अगदी माझ्या वयाच्या ५ ते ६ वर्षात मी पाहिले, माझे बाबा त्या पेपरांच्या गठ्यांमध्ये कुठेतरी एका वहीच्या पानांच्या कुशीत काहीतरी ठेवायचे आणि प्रत्येक वेळी माझ्या काहुरलेल्या मनाला हा प्रश्न पडायचा की, काय बरं ठेवत असतील बाबा त्या पानांच्या आड? आणि हा प्रश्न मला ते जाणून घेण्याची उत्कंठा वाढवायचा. पण माझे वय अगदी लहान असल्याकारणाने बाबा मला आपल्या पेपरच्या गठ्ठ्यांना हात लावू देत नसत. काही वर्षं उलटली, बाबांचा हा नित्यक्रम चालूच असायचा.
जेव्हा मी इयत्ता ५वीला पोहचले तेव्हा मी माझ्या मनाला आवर घालूच शकले नाही व पक्का निर्धार केला की, मी त्या पेपर गठ्ठ्यांमागच्या रहस्याचा शोध घेणारच अन् मी बाबांच्या नकळत त्या गठ्याला गाठले आणि फार उत्साहाने व कुतूहलाने त्यात शोधत बसले. मन कसे अगदी प्रफुल्लित पण तेवढेच बाबा येतील या भीतीने कावरेबावरे होत होते; पण अलगदपणे शोधता शोधता एकदाचे मला ती वही सापडली व त्या धुळीने माखलेल्या वहीत मी नावीन्याचा शोध घेत होते. एवढ्यात मला त्या पानांनमध्ये बरीचशी रंगीबेरंगी छोटीछोटी कागदी कात्रणं सापडली व मी ते एक एक करुन बाहेर काढत वाचू लागले. पूर्णत: मला त्याचा अर्थ उमगल नव्हता पण काहीसे कळत होते, त्यात बाबांनी कविता, लेख, चारोळ्या, इत्यादी साहित्याचे कात्रण त्यांच्या त्या वाचनालयात सुरक्षित असे ठेवले होते. ते वाचता वाचता माझे मन कधी त्यात व्यग्र होऊन मी तल्लीन झाले हे मलाही कळले नाही. व तिथून मलाही लिखाणाची आवड निर्माण झाली. पण अंथरुण लहान अन् पाय मोठे! म्हणजे त्यात स्वत:ला झोकून घेण्याएवढे माझे ज्ञान व शब्द भंडार पुरेसे नव्हते.
पण माझ्या आजच्या या लेखनाला जर कोणी प्रवृत्त केले असेल तर ते माझे बाबाच. कारण जर त्यांनी ती कात्रणे जपून ठेवली नसती तर मी काही त्यातले महत्त्व जाणले नसते. मूळ म्हणजे कुठेतरी साहित्याची गोडी त्यांच्यात होती म्हणून आज माझ्यावर त्यांच्या कळत नकळत का असेना पण ते संस्कार घडले आणि मी तेव्हापासून लेखनाकडे वळले. लहान मुलं लहानपणी बऱ्याचशा गोष्टी आपल्या आईवडिलांचे अनुकरण करत शिकत असतात. तेव्हा मला घडवण्याचे कौशल्य माझ्या बाबांकडे होते. म्हणून लेखनाकडे वळू शकले.
वडिलांची माया म्हणजे नभातील न मोजण्याजोगे असंख्य तारे,
वडिलांचे प्रेम म्हणजे लखलखणारा सूर्य जो स्वत: जळून इतरांना तेजोमयी करतो
वडील म्हणजे पूर्णत: नादब्रह्म...
आयुष्यातील खूप सुंदर, सुरेख अशी व्यक्ती म्हणजे वडील
आणि त्यांना संपूर्णात आणणारी व्यक्ती म्हणजे आई
यातच पूर्ण विश्व आणि परमेश्वरी शक्ती लपलेली
आई, जिला आपल्या लेकरांच्या सुखासमोर अगदी
स्वत:चे अस्तित्वदेखील शून्य वाटते.... वा!! धन्य ते
मातापिता अन् धन्य तो ईश्वर