सायबर पोलिसांकडून ‘सायबर सुरक्षेसाठी सायबर शिक्षा’ उपक्रम गोव्यात सुरू

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
04th October 2023, 12:19 pm
सायबर पोलिसांकडून ‘सायबर सुरक्षेसाठी सायबर शिक्षा’ उपक्रम गोव्यात सुरू

पणजी : डिजिटल तंत्रज्ञानामुळे मानवी व्यवहार, समन्वय आणि कामाची गती वाढली असली तरी तितकेच धोकेही वाढले आहेत. या तंत्रज्ञानात घुसलेल्या दुष्प्रवृत्ती सामान्य नागरिकाला अक्षरशः भीकेला तरी लावत आहेत किंवा त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करत आहेत. म्हणून अशा दुष्प्रवृत्तीपासून सर्वांनीच सावध राहणे गरजेचे आहे. याच विषयावर जागृती करण्यासाठी गोवा पोलिसांच्या सायबर सेलने ‘सायबर सुरक्षेसाठी सायबर शिक्षा’ उपक्रम सुरू केला आहे.

पुण्यातील क्विक हील फाऊंडेशनच्या मदतीने गोव्यात ‘सायबर सुरक्षेसाठी सायबर शिक्षा’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती गोवा सायबर सेलने दिली आहे. याचा शुभारंभ पर्वरीतील विद्याप्रबोधिनी उच्च माध्यमिक विद्यालयातून काल करण्यात आला. आता राज्यातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना याची माहिती दिली जाईल. याचबरोबर ४० सार्वजनिक ठिकाणी पथनाट्याद्वारे लोकांना सतर्क केले जाईल. यामध्ये नेमके सायबर चोर गंडा कसा घालतात? सायबर कारस्थाने कशी रचली जातात? सायबर सुरक्षा म्हणजे नेमके काय? यावर प्रकाश टाकला जाणार आहे.

पर्वरीतील कार्यक्रमाचे उद्घाटन सायबर सेलचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल (आयपीएस) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका रेषा पेडणेकर, पोलीस निरीक्षक विद्यानंद पवार, सुनील नलावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्व पथनाट्यांचे आयोजन सायबर सेलचे पोलीस निरीक्षक विद्यानंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केले जाणार आहे. सायबर क्राईमच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकणारे हे पथनाट्य मराठी भाषेत आहे. भारतातील गुजरात, हरयाणा, तेलंगणा आणि इतर विविध राज्यांमध्ये याआधी हीच पथनाट्ये आयोजित करण्यात आली आहेत. 

हेही वाचा