वाचा... गोव्यात ३६ वर्षांत इतक्या जणांचा झाला एड्समुळे मृत्यू!

१७,५१५ व्यक्तींना एचआयव्हीची बाधा; पैकी १,८९० जणांना एड्स

Story: पिनाक कल्लोळी । गोवन वार्ता |
26th September 2023, 04:30 pm
वाचा... गोव्यात ३६ वर्षांत इतक्या जणांचा झाला एड्समुळे मृत्यू!

पणजी : राज्यात १९८७ ते जुलै २०२३ या ३६ वर्षांच्या काळात १७ हजार ५१५ व्यक्तींना एचआयव्हीची बाधा झाली होती. या काळात एकूण १ हजार ८९० जणांना एड्स झाला होता. त्यातील १,२९८ बाधितांचा मृत्यू झाला. राज्य एड्स नियंत्रण संस्थेचे प्रकल्प संचालक डॉ. गोकुळदास सावंत यांनी ‘गोवन वार्ता’शी बोलताना ही माहिती दिली. २००९ साली सर्वाधिक १४० मृत्यूची नोंद झाली होती.

मृत्यू झालेल्या १ हजार २९८ पैकी ८५८ म्हणजेच ६६ टक्के पुरुष रुग्ण होते, तर ४३९ महिला रुग्णांचा व एका तृतीयपंथी रुग्णाचा समावेश होता. २००८ मध्ये ११५, २००७ मध्ये १०९ तर २००६ मध्ये १०८ जणांचा एड्समुळे मृत्यू झाला. २००२ मध्ये सर्वांत कमी १४ मृत्यूंची नोंद झाली. जानेवारी ते जुलै २०२३ दरम्यान ११ पुरुष व ५ महिलांचा मृत्यू झाला आहे.            

प्राप्त माहितीनुसार, एकूण १७ हजार ५१५ बाधितांपैकी ११ हजार १४० पुरुष, ५ हजार ९८४ महिला, तर १४ तृतीयपंथी होते. २००५ आणि २००७ मध्ये प्रत्येकी १ हजार २९ एचआयव्ही बाधित सापडले होते. २००३ मध्ये १०१६, २००२ मध्ये ९९९ तर २००४ मध्ये ९५६ बाधित सापडले होते. १९८७ मध्ये सर्वांत कमी म्हणजे फक्त तिघांना एचआयव्हीची बाधा झाली होती. यंदा १ जानेवारी ते जुलै २०२३ दरम्यान ९२ पुरुष, ४३ महिला व एका तृतीयपंथी व्यक्तीला एचआयव्हीची बाधा झाली आहे.

राज्यात १९८७ साली आढळला पहिला रुग्ण 

राज्यात १९८७ साली एचआयव्हीचा पहिला रुग्ण सापडला होता. ती व्यक्ती विदेशी नागरिक होती. १९८८ मध्ये परराज्यातील रुग्ण सापडला, तर १९८९ मध्ये प्रथमच गोमंतकीयाला एचआयव्हीची बाधा झाली. तो विद्यार्थी होता. १९८७ ते १९९२ दरम्यान २०१ एचआयव्ही बाधित सापडले होते.     

‘‘गेल्या ३० वर्षांची आकडेवारी पाहता एचआयव्ही बाधित होण्याचे प्रमुख कारण असुरक्षित लैंगिक संबंध हेच आहे. याबाबत राज्य सरकार मोठ्या प्रमाणात जागृती करत आहे. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत एचआयव्ही बाधितांचे तसेच एडसमुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे.’’

- डॉ. गोळकुदास सावंत, प्रकल्प संचालक, गोवा एड्स नियंत्रण संस्था

हेही वाचा