पणजी : केंद्रीय, बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते पणजी येथील आग्वाद किल्ल्यावर देशातील पहिल्या भारतीय दीपगृह उत्सवाचे उद्घाटन झाले.
भारतातील ७५ ऐतिहासिक दीपगृहांचा समृद्ध सागरी इतिहास पुनरुज्जीवित करण्याच्या तसेच या दीपगृहांशी संबंधित कथा जगासमोर आणण्याच्या हेतूने, या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी, जलमार्ग आणि पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, पर्यटन मंत्री रोहन खंवटे, आमदार मायकल लोबो यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारमधील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सर्बानंद सोनोवाल म्हणाले, या उत्सवाचे उद्घाटन करुन, आपण भारताच्या विशाल किनारपट्टीवर असलेल्या प्राचीन दीपगृहांचे पुनरुज्जीवन करणार आहोत. ही सर्व स्थळे पर्यटन स्थळे म्हणून विकसित केली जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण आत्मनिर्भर भारताच्या दिशेने वाटचाल करत आहोत.
सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून ऐतिहासिक स्थळे जागतिक दर्जाच्या पर्यटन स्थळांच्या रूपात विकसित करण्याच्या उद्देशाने, भारतीय दीपगृह महोत्सवाचे आयोजन, केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने केले आहे. दीपगृह आणि दीपनौका (लाइटशिप्स) महासंचालनालयाने यापूर्वीच अशी ७५ दीपगृहे महोत्सवासाठी निश्चित केली आहेत.
यावेळी भारत प्रवाह या इन्स्टिट्यूट फॉर गव्हर्नन्स, पॉलिसी अँड पॉलिटिक्सच्या पुढाकाराने आयोजित ‘व्हॅनगार्ड्स ऑफ अवर शोर्स : लाइटहाऊसेस अॅज टेस्टामेंट्स ऑफ इंडियाज पास्ट अँड प्रेझेंट’ या सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या सत्रात राखीगढी फेम इतिहासकार आणि पुरातत्वशास्त्रज्ञ प्रा. वसंत शिंदे यांनी भारताच्या सागरी इतिहासातील दीपगृहांचे ऐतिहासिक महत्त्व सांगितले. डॉ सुनील गुप्ता आणि गोवा राज्य संग्रहालयाचे संचालक डॉ. वासू उसपाकर यांनीही या सत्रात भाषण केले.
सांस्कृतिक प्रदर्शने, सागरी इतिहास आणि संस्कृतीवर प्रकाशझोत टाकणारी सत्रे, शास्त्रीय आविष्कार, प्रकाश-ध्वनी खेळ, ख्यातनाम गायकांच्या गायनाने बहरलेली संगीतमय संध्याकाळ, मत्स्य पाककृती आणि स्थानिकांचा सहभाग ही भारताच्या पहिल्या दीपगृह महोत्सवाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.