म्हापसा बाजारपेठ फुलली माटोळी बाजाराने

ग्रामीण भागातील लोक माटोळी साहित्य घेऊन दाखल

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17th September 2023, 11:28 pm
म्हापसा बाजारपेठ फुलली माटोळी बाजाराने

म्हापसा : गणेश चतुर्थी सणाच्या निमित्ताने म्हापसा बाजारपेठ सजली आहे. माटोळीचे साहित्य बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहे. यंदा म्हापसा पालिकेने मार्केटच्या मुख्य आळीमध्ये माटोळी बाजाराचे नियोजन केले आहे.

रविवारी बाजारात माटोळीचे साहित्य दाखल झाले. नेहमीप्रमाणेच ग्राहकांचा प्रतिसाद असून सोमवारी चतुर्थीच्या पूर्वसंध्येला माटोळी खरेदीसाठी गर्दी उसळण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.

गोव्यात माटोळी सजविल्याशिवाय श्री गणेश मूर्तीचे पूजन अपूर्ण असते. घरात श्रींची मूर्ती पूजेला लावली जाते. चतुर्थीच्या काळात थोडेफार पैसे मिळतील, या आशेने ग्रामीण भागातील लोक अधिकतर महिला मोठ्या संख्येने माटोळीचे साहित्य बाजारात घेऊन विक्रीस येतात.

म्हापसा ही उत्तर गोव्यातील मोठी बाजारपेठ असल्यामुळे या ठिकाणी ग्राहकांची मोठी संख्या असते. त्यामुळे विक्रेते मोठ्या संख्येने या ठिकाणी मोटोळीचे साहित्य घेऊन येतात.

मार्केटमध्ये जवळपास ३०० पेक्षा जास्त माटोळी विक्रेते दाखल झाले आहेत. यासाठी म्हापसा पालिकेने दीड बाय दीड जागा चिन्हांकित केली आहे. तसेच अतिरिक्त जागेचीही तरतूद पालिकेने करुन ठेवली आहे.

लोक माटोळी साहित्यासह, भाजीपाला, सजावटीचे साहित्य व कपडे खरेदीसाठी बाजारपेठेत आल्यामुळे सध्या मार्केटमध्ये ग्राहकांची बरीच गर्दी झाली आहे. सोमवारी गर्दीचे प्रमाण आणखी वाढणार आहे.

पालिकेने माटोळी बाजारासाठी मार्केटमध्येच व्यवस्था केली आहे. यासाठी जागाही चिन्हांकित केली आहे. शकुंतला पुतळ्यासमोरील रस्त्यावर तीन रांगा करून विक्रेत्यांना बसवले आहे. तसेच बाजूच्या दोन आळींमध्ये देखील माटोळी विक्रेत्यांची व्यवस्था केली आहे.

खरेदीसाठी लोक बाजारपेठेत गर्दी करू लागल्याने येथील मार्केटसमोरील रस्त्यावर वाहनांची गर्दी झाली अाहे. चतुर्थीच्या सणाचा माहोल शहरात निर्माण झाला आहे. ऑनलाईनचा जमाना असल्याने काही माटोळी विक्रेत्यांकडे गुगल-पेची व्यवस्थाही आहे. सुपारीचे शिपटे १०० ते ६००, उतरलेला नारळ १००, कांगले ५०, कवंडाळ ५०, करांदे ५०, आंबाडे ५० (१० नग), चिबूड १०० रुपये असे बाजारपेठेत रविवारी दर होते.  


हेही वाचा