प्रादेशिक आराखडा गावनिहाय असावा : लोबो

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
26th May 2023, 11:43 pm
प्रादेशिक आराखडा गावनिहाय असावा : लोबो

म्हापसा : गोव्याचा आगामी प्रादेशिक आराखडा हा गावनिहाय अस्तित्वात यावा. जेणेकरून सदर गावातील अभ्यासू व जाणकारांना आराखड्याची सखोल माहिती मिळू शकेल, असे मत आमदार मायकल लोबो यांनी व्यक्त केले.

पर्रा येथील सर्कल ते नागवा जंक्शन दरम्यानच्या रस्त्याच्या हॉटमिक्सिंग कामाचा शुभारंभ केल्यानंतर लोबो बोलत होते. यावेळी सरपंच चंदानंद हरमलकर व पंचायत मंडळ उपस्थित होते.

प्रादेशिक आराखडा २०२१ ला आम्ही २०१२ मध्ये विरोध केला होता. त्यामुळे हा आराखडा पाच वर्षे स्थगित ठेवण्यात आला होता व २०१७ मध्ये तो अंमलात आणला गेला. २०२१ चा हा आराखडा सध्या संपुष्टात आला आहे. त्यामुळे नवीन आराखडा अस्तित्वात आणताना तो गावनिहाय असावा. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना या आराखड्यातील बारकावे समजू शकतील, असे लोबो म्हणाले.

शिवाय इमारत कायद्यात दुरूस्ती व सुधारणा करण्यासाठी आर्किटेक्ट, अभियंता, माजी नगरनियोजक या क्षेत्राचे ज्ञान असलेल्या मंडळींचे सहकार्य घ्यायला हवे. त्यांनी कायद्यातील चुका आणि सुधारणांविषयी आपले लिखित मत मांडायला हवे, असेही लोबो म्हणाले.

दरम्यान, गोवा हे सर्व समावेशक असे जागतिक पर्यटनस्थळ आहे. उच्च न्यायालयाने रात्री उशीरा संगीतरजनींवर बंदी घातली आहे. पण बंद घरातील संगीतावर बंदी घातलेली नाही. बरेच पर्यटक या ठिकाणी संगीत रजनी व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा आस्वाद घेण्यासाठी येतात, असे लोबो यांनी सांगितले.