धुळापीतील मूर्तीवादावर तात्पुरता तोडगा

पोलीस बंदोबस्तात मूर्ती मंडपात : खंडपीठाच्या आदेशानंतर पुढील निर्णय


28th March 2023, 01:06 am

मंडपाबाहेर ठेवण्यात आलेला पोलीस बंदोबस्त. (मान्युएल वाझ)


प्रतिनिधी। गोवन वार्ता

पणजी : धुळापी-खोर्ली येथील सातेरी देवीच्या मूर्तीच्या स्थापनेचा तात्पुरता तोडगा काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. सातेरी देवीची नवीन मूर्ती मंदिराच्या मंडपात कुलूप लावून ठेवण्यात आली आहे. खंडपीठाचा निकाल येईपर्यंत मूर्ती मंडपातच राहणार आहे. खंडपीठाच्या आदेशानुसार मूर्तीच्या स्थापनेबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

विरोध करणारा गट गाडीसमोर उभा राहिला. सोमवारी हा प्रश्न निकाली काढण्यात प्रशासनाला यश आले. दोन्ही गटांमध्ये समजूत काढल्यानंतर त्यांनी मूर्ती मंडपाला कुलूप बंद करून ठेवली आहे. सोमवारी नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार होती. मात्र, ती होऊ शकली नाही.

धुळापी- खोर्ली येथे देवीची नवीन मूर्ती स्थापना करण्याच्या विचारात एक गट आहे. दुसऱ्या गटाचा नव्या मूर्तीला विरोध आहे. यावरून दोन गटात वाद निर्माण झाला आहे. खंडपीठामध्ये हे प्रकरण प्रलंबित आहे. खंडपीठाच्या आदेशानुसार पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. ही मूर्ती मंदिराच्या मंडपात कुलूप बंद करून ठेवण्यात आली आहे. त्या मूर्तीची स्थापना झाली नसली तरी ती सुरक्षित ठेवण्यात आली आहे.

रविवारी सातेरी देवीची नवीन मूर्ती एका गाडीमधून आणली जात असताना दुसऱ्या गटातील लोकांनी गाडी अडवली. सर्व महिला गाडीच्या समोर जाऊन उभ्या राहिल्या. तणावानंतर उपजिल्हाधिकारी, प्रकरण अधिकारी आणि पोलीस शाखेने घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही गटातील लोक रस्त्यावर उतरले होते. काही वेळाने मूर्तीची प्रतिष्ठापना करणाऱ्या मंडळींनी मूर्ती गाडीमध्येच ठेवली.

मंदिर बांधकामाचा वाद न्यायप्रविष्ठ

मंदिराच्या बांधकामावरून दोन्ही गटामधील वादाचा खंडपीठात खटला सुरू आहे. हे बांधकाम बेकायदेशीर असल्याचा एका गटाचा दावा आहे. खंडपीठात सुनावणी सुरू असताना एक गट नवी मूर्ती स्थापना करण्याचा प्रयत्न करत आहे.

कोण काय म्हणाले...

-जुने मंदिर पाडून नवीन बांधण्यासाठी आम्हाला विश्वासात घेतले गेले नाही, असे गोरखनाथ केरकर यांनी सांगितले.

-धार्मिक सल्लामसलत करूनच मूर्ती स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अध्यक्ष भिकू धुळापकर यांनी सांगितले.

हेही वाचा