चार वर्षांत १५ सरकारी कर्मचारी निलंबित

मुख्यमंत्री डॉ. सावंत : ८ जण पुन्हा सेवेत

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
28th March 2023, 12:15 Hrs
चार वर्षांत १५ सरकारी कर्मचारी निलंबित

पणजी : सेवेत गैरप्रकार, विनयभंग, जमीन हडपप्रकरणी अटक केल्यामुळे तसेच निष्काळजीपणा केल्यामुळे २०१९ ते १० मार्च २०२३ या कालावधीत १५ सरकारी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यातील ८ जणांना पुन्हा सेवेत घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री तथा दक्षता खात्याचे मंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत लेखी उत्तरात दिली आहे.

या प्रकरणी मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी विधानसभेत अतारांकित लेखी प्रश्न दाखल केला होता. लेखी उत्तरात दिलेल्या माहितीनुसार, विनयभंगाच्या आरोपाखाली एका डाॅक्टरला, दारू पिऊन सेवेत आल्यामुळे एका कर्मचाऱ्याला, तर जमीन हडपप्रकरणी अटक केल्यामुळे एका मामलेदारासह १५ सरकारी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यात सार्वजनिक बांधकाम खात्याचे तीन, आरोग्य खाते, रोजगार व कामगार खात्याचे, नोंदणी खात्याचे आणि कार्मिक खात्याचे प्रत्येकी दोन, तर माहिती व तंत्रज्ञान खात्याचा, वीज खात्याचा, वाहतूक खात्याचा आणि माहिती व प्रसिद्धी खात्याचा प्रत्येकी एक मिळून १५ सरकारी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यातील ८ जणांना पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे.

या शिवाय २०१९ पूर्वी निलंबित केलेल्यांपैकी चार जणांना मिळून २०१९ ते १० मार्च २०२३ पर्यंत १२ जणांना पुन्हा सेवेत घेण्यात आल्याची माहिती लेखी उत्तरात दिली आहे.