जलक्रीडांचे नियमन आवश्यक !

रोहन खंवटे : व्यावसायिक पातळीवरील स्पर्धेत वाढ

Story: प्रतिनिधी । गाेवन वार्ता |
28th March 2023, 12:11 am
जलक्रीडांचे नियमन आवश्यक !



पणजी : जलक्रीडांना (वॉटर स्पोर्टस) पर्यटकांसह स्थानिकांचीही मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. दिवसेंदिवस जलक्रीडांमधील स्पर्धा वाढत आहे. त्यामुळे जलक्रीडांचे नियमन गरजेचे बनले आहे, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले. 

जलक्रीडांच्या विषयावर सभागृहात चर्चा झाली. जलक्रीडांचे शुल्क तसेच नियमावलीत समानता असायला हवी. जलक्रीडांचे ऑपरेटर शुल्क जास्त आकारतात, अशा तक्रारी आहेत. सिंधुदुर्गमधील मालवणमध्ये जलक्रीडा मोठ्या प्रमाणात चालतात. गोव्यात शुल्क तसेच नियमांची कार्यवाही झाली नाही, तर गोव्यातील जलक्रीडांचा ग्राहक कमी होऊ शकतो. त्याचा फायदा मालवणमधील व्यावसायिकांना होईल. सध्या बरेच पर्यटक जलक्रीडांसाठी मालवणला जाऊ लागले आहेत, असे रोहन खंवटे म्हणाले. 

आमदार वीरेश बोरकर यांच्या लक्षवेधी सूचनेवर मंत्री रोहन खंवटे बोलत होते. 

शॅकप्रमाणे जलक्रीडा पर्यटनाला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. राज्यात जलक्रीडा ऑपरेटरांची संख्या वाढत आहे. त्यांची संघटना स्थापन झाली आहे. पॅराग्लायडिंगसाठी ३०० ते ३ हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारणी केली जाते. ४०० रुपयांऐवजी हजाराे रुपये आकारले जातात. असे झाले तर पर्यटक पुन्हा गोव्यात कशाला येतील, असे मंत्री रोहन खंवटे म्हणाले. 

दलालांची सद्दी संपणार!

गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या माध्यमातून जलक्रीडांचे नियमन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जलक्रीडा ऑपरेटरांनी त्याला सहकार्य करावे, असे आवाहन रोहन खंवटे यांनी केले. पर्यटन उद्योगात दलालांचा शिरकाव झाला आहे. जलक्रीडांमध्येही दलाल आहेत. जलक्रीडांचे नियमन झाल्यानंतर या दलालांना वाव उरणार नाही, असे खंवटे म्हणाले.

जलक्रीडा संघटनेशी मुख्यमंत्र्यांची बैठक     

जलक्रीडा ऑपरेटर संघटनेसोबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बैठक घेतली. गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमुळे निर्माण झालेला गैरसमज दूर होईल, असे मुख्यमंत्र्यांनी बैठकीनंतर सांगितले. अाणखी एक बैठक होण्याची गरज आहे. राज्यात जलक्रीडा पर्यटन व्यवस्थित चालायला हवे. स्थानिकांना रोजगार मिळायला हवा, या उद्देशाने जलक्रीडांचे नियमन होईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

हेही वाचा