मतदानापूर्वी भाजपा उमेदवार पियूष पटेल यांच्यावर हल्ला

गुजरात विधानसभा निवडणूक : वांसदा मतदार संघातील प्रकार; काँग्रेसवर आरोप


02nd December 2022, 01:10 am
मतदानापूर्वी भाजपा उमेदवार पियूष पटेल यांच्यावर हल्ला


न्यूज डेस्क । गोवन वार्ता

अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. मात्र, मतदानापूर्वीच या निवडणुकीला गालबोट लागले. भाजपा उमेदवार पियूष पटेल यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. दरम्यान, हा हल्ला काँग्रेस उमेदवारांच्या समर्थकांनी केल्याचा भाजपाने आरोप केला आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी गुरुवारी सौराष्ट्र-कच्छ प्रांत व दक्षिणेकडील १९ जिल्ह्यांतील ८९ मतदारसंघांत मतदान पार पडले. या मतदानापूर्वीच नवसारी जिल्ह्यातील वांसदा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार पियूष पटेलवर अज्ञात लोकांनी हल्ला केला. या हल्ल्यात पटेल जखमी झाले. निवडणूक प्रचारादरम्यान पियूष पटेल हे वांसदा मतदारसंघातील झरी गावात होते. भाजपाने काँग्रेस उमेदवार अनंत पटेल यांच्या समर्थकांवर हल्ल्याचा आरोप केला. या प्रकरणी वंसदा ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पियूष पटेल समर्थकांनी काँग्रेसच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. वंसदा गुजरातमधील नवसारी जिल्ह्याचा भाग आहे आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारासाठी हा मतदारसंघ आरक्षित आहे.

७८८ उमेदवार रिंगणातराज्यातील १९ जिल्ह्यांतील या जागांसाठी ७८८ उमेदवार रिंगणात आहेत. पहिल्या टप्प्यात २ कोटींहून अधिक मतदारांना मतदानाचा हक्क बजावला. पहिल्या टप्प्यातील एकूण ८९ जागांपैकी भाजपला सर्वाधिक ५८, काँग्रेसकडे २६ आणि बीटीपीकडे २, राष्ट्रवादीला एक जागा आहे, अशी माहिती मिळाली आहे.

निवडणुकीबाबत काही ठळक अपडेट

१) गुजरातचा मिनी आफ्रिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जांबूर गावात लोकांना मतदानासाठी खास आदिवासी बूथ बनवण्यात आले होते.

२) १८२ हून अधिक मतदान केंद्रांवर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी कार्यरत होते. १,२७४ बूथवर सर्व महिला कर्मचारी उपस्थित होत्या.

३) अमरेलीचे काँग्रेस आमदार परेश धनानी रिकामे गॅस सिलिंडर सायकलवर घेऊन मतदानासाठी आले. गॅस, इंधन दरवाढीचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

४) द्वारकाच्या खंभलियामध्ये मतदानासाठी आलेले 'आप'चे सीएम उमेदवार आपले आय-कार्ड घरीच विसरल्याने त्यांना ४५ मिनिटे वाट पाहावी लागली.

पहिल्या टप्प्यात सात जागांवर आपचा प्रभाव

पहिल्या टप्प्यातील एकूण ८९ जागांपैकी सहा ते सात जागा अशा आहेत, जिथे केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचा म्हणजेच आपचा प्रभाव आहे. यातील सहा जागा सुरत जिल्ह्यातील आहेत. तर एक जागा द्वारका जिल्ह्यात आहे. द्वारकाच्या खंभलिया मतदारसंघातून आपचे मुख्यमंत्री उमेदवार इशुदान गढवी रिंगणात आहेत.

गुजरात, हिमाचल प्रदेशचा निवडणूक निकाल एकाच दिवशी

गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी ५ डिसेंबर रोजी ९३ जागांसाठी मतदान पार पडणार आहे. त्यानंतर हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजे ८ डिसेंबर रोजी लागणार आहे. भाजपसमोर यंदा आपच्या अरविंद केजरीवाल यांनी चांगले आव्हान उभे केले आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.