२५ खेळाडू अर्जुन पुरस्काराने सन्मानित : गोव्याच्या भक्ती कुलकर्णीचा समावेश

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून प्रतिष्ठित अर्जुन पुरस्कार स्वीकारताना भक्ती कुलकर्णी.
.........
न्यूज डेस्क। गोवन वार्ता
दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी राष्ट्रपती भवनात २०२२चे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान केले. यावेळी राष्ट्रपती भवनात खेळाडू आणि प्रशिक्षकांचा गौरव करण्यात आला. टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न प्रदान करण्यात आला.
त्याचवेळी बुद्धिबळ ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदसह इतर २५ क्रीडापटूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये गोव्याची बुद्धिबळपटू भक्ती कुलकर्णी हिचाही समावेश होता. अर्जुन पुरस्कार मिळवणारी भक्ती ही गोव्यातील पहिली महिला खेळाडू आहे. या खेळाडूंव्यतिरिक्त ४ प्रशिक्षकांना यंदाचा द्रोणाचार्य पुरस्कार आणि केवळ ४ खेळाडूंना जीवनगौरव पुरस्कारासाठी ध्यानचंद पुरस्कार देण्यात आला.
तब्बल तीन महिन्यांच्या विलंबानंतर अखेर बुधवारी यंदाचे क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी क्रीडा जगतात भारताचा नावलौकिक मिळवलेल्या खेळाडूंचा गौरव केला. २८ ऑगस्ट रोजी हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या वाढदिवसानिमित्त क्रीडा दिन साजरा केला जातो. त्याच दिवशी हे पुरस्कार दिले जातात. मात्र, यंदा राष्ट्रकुल स्पर्धेमुळे सदर पुरस्कार लांबणीवर पडले.
भारताचा स्टार आणि अनुभवी टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल याला यावर्षीचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. यंदा हा पुरस्कार मिळवणारा तो एकमेव खेळाडू होता. त्यांच्याशिवाय २५ खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात खेळाडू आणि प्रशिक्षकांचा गौरव करण्यात आला. यंदाच्या विजेत्यांच्या यादीत एकाही क्रिकेटपटूचा समावेश नाही.
खेलरत्न पुरस्कार २०२२ : अचंता शरत कमल (टेबल टेनिस)
अर्जुन पुरस्कार : सीमा पुनिया (एथलेटिक्स), एल्डहॉस पॉल (एथलेटिक्स), अविनाश मुकुंद साबळे (एथलेटिक्स), लक्ष्य सेन (बैडमिंटन), एचएस प्रणॉय (बॅडमिंटन), अमित पंघाल (बॉक्सिंग), निखत जरीन (बॉक्सिंग) भक्ति प्रदीप कुलकर्णी (बुद्धिबळ), आर प्रज्ञानानंद (बुद्धिबळ), अंशु (कुस्ती) सरिता (कुस्ती), परवीन (वूशु), मानसी गिरीशचंद्र जोशी (पॅरा बॅडमिंटन), तरुण ढिल्लों (पॅरा बॅडमिंटन), स्वप्निल पाटील (पॅरा बॅडमिंटन), जेरलिन अनिका जे (डैफ बॅडमिंटन), दीप ग्रेस एक्का (हॉकी), सुशीला देवी (ज्युदो), साक्षी कुमारी (कबड्डी), नयन मोनी सैकिया (लॉन बॉल), सागर कैलास ओवलकर (मल्लखांब), एलावेनिल वलारिवान (शूटिंग), ओमप्रकाश मिथरवाल (शूटिंग), श्रीजा अकुला (टेबल टेनिस), विकास ठाकुर (वेटलिफ्टिंग).