सोलापूर, अक्कलकोटही कर्नाटकात समाविष्ट करावेत

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे विधान

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
25th November 2022, 12:14 Hrs
सोलापूर, अक्कलकोटही कर्नाटकात समाविष्ट करावेत

 मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेच्या मुद्द्यावर विधान केल्यावर, त्यांचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हटले आहे. याउलट महाराष्ट्रातील सोलापूर आणि अक्कलकोटसारखे कन्नडभाषिक भाग आमच्या राज्यात समाविष्ट केले पाहिजेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले की, देशाची जमीन, पाणी आणि सीमांचे रक्षण करण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे. आता भाजपच्याच मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे आव्हान दिले असल्याने देवेंद्र फडवणीस आणि महाराष्ट्र सरकार काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील काही गावांनी कर्नाटकमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा दावा राज्य सरकार तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी खोडून काढला. महाराष्ट्रातील एकही गाव राज्याबाहेर जाऊ देणार नाही, अशी ग्वाही सरकारने दिली आहे. तसेच बेळगाव-कारवार-निपाणीसह मराठी भाषिकांची गावे मिळविण्यासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे लढा देईल, असा निर्धारही फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ट्वीट करत फडणवीसांना उत्तर दिले आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेच्या मुद्द्यावर चिथावणीखोर विधान केलं असून, त्यांचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. कर्नाटकच्या सीमाभागातील कोणतीही जागा देण्याचा प्रश्नच येत नाही. याउलट महाराष्ट्रातील सोलापूर आणि अक्कलकोटसारखे कन्नडभाषिक भाग आमच्या राज्यात समाविष्ट केले पाहिजेत.

२००४ पासून महाराष्ट्र सरकारने सीमाभागातील वादाप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. आतापर्यंत त्यांना यश आलेले नाही आणि मिळणारही नाही. आम्ही कायदेशीर लढ्यासाठी तयार आहोत, असेही बोम्मई यांनी सांगितले आहे.