आसामचे वन कार्यालय मेघालयातील जमावाने जाळले

दोन राज्यांतील सीमेवर हिंसाचार : ठिकठिकाणी वाहनांची जाळपोळ

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
25th November 2022, 12:12 Hrs
आसामचे वन कार्यालय मेघालयातील जमावाने जाळले

दिसपूर : मेघालय-आसाम सीमेवरील एका वादग्रस्त क्षेत्रात मंगळवारी झालेल्या गोळीबारात सहा जणांचा बळी गेल्यानंतर हिंसाचार वाढला आहे. मेघालयमधील एका जमावाने आसामच्या पश्चिम कार्बी आंगलोंग जिल्ह्यातील एक वन कार्यालय पेटवून दिले. तर मुक्रोह गावासह मेघालयची राजधानी शिलाँगमध्येही संतप्त जमावाने दोन वाहनांची जाळपोळ केली आहे.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आसामच्या खेरोनी फॉरेस्ट रेंजमधील आंतरराज्यीय सीमेलगतच्या एका वन कार्यालयाबाहेर संतप्त जमाव चाकू, रॉड व लाठ्याकाठ्या घेऊन जमला होता. या जमावाने मोडतोड करून कार्यालय परिसरात ठेवलेले फर्नीचर, दस्तावेज व दुचाकी पेटवून दिली.

सुरक्षा कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेण्यापूर्वीच हा जमाव तेथून पळून गेला. या घटनेत कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही. याशिवाय स्थानिक लोकांनी मुक्रोह गावात बेवारस स्थितीत आढळलेले आसाम सरकारचे एक वाहनही पेटवून दिले.

मेघालयच्या खासी विद्यार्थी संघटनेने मुक्रोहमधील फॉरेस्ट कार्यालय व आसाम सरकारच्या वाहनांच्या जाळपोळीची जबाबदारी घेतली. मेघालयमधील एमडीए व्यवस्था आपल्या नागरिकांची सुरक्षा करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी इलोंग सिव्हिल रुग्णालयापुढेही निदर्शने केली. या ठिकाणी गोळीबारात ठार झालेल्या नागरिकांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी आणले होते. यावेळी निदर्शकांनी या नागरिकांच्या हत्येसाठी जबाबदार व्यक्ती मेघालय पोलिसांकडे सोपवण्याची मागणी केली.

शिलाँगच्या झालूपारा भागात बुधवारी महावीर पार्कलगत एक एसयूव्ही पेटवून देण्यात आली. मेघालयमध्ये येणाऱ्या वाहनांवरील हल्ल्यांत वाढ झाल्यानंतर आसाम पोलिसांनी कार चालकांना शेजारच्या राज्यात न जाण्याचा सल्ला दिला आहे. गुवाहाटी व कछार जिल्ह्यासह आसामहून मेघालयला जाणाऱ्या मार्गांवर पोलीस कर्मचाऱ्यांनी बॅरीकेड्स लावले. पण आतापर्यंत एकाही मोठ्या वाहनाला थांबवण्यात आले नाही. आसाम पोलिसांच्या मते गुंड खासगी व छोट्या वाहनांवर हल्ले करत आहेत.

मेघालयच्या मुख्यमंत्र्यांची मोदींकडे तक्रार

मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांना टॅग करत एक ट्विट केले की, आसाम पोलीस व फॉरेस्ट गार्ड्सनी मेघालयच्या हद्दीत येऊन गोळीबार केला. दुसरीकडे, आसाम पोलिसांनी ट्रकवर पश्चिम कार्बी आंगलोंग जिल्ह्यातील वन विभागाच्या टीमने रोखल्याचा दावा केला. स्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे गोळीबार करण्याची वेळ आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.