जेवढे प्रादेशिक आपण दाखवू तेवढे जास्त जागतिक होऊ

रिषभ शेट्टी : उलगडला ‘कांतारा’चा प्रवास

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
25th November 2022, 12:05 am
जेवढे प्रादेशिक आपण दाखवू तेवढे जास्त जागतिक होऊ

पणजी : भारत हा विविधतेत एकता असणारा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. प्रत्येक प्रदेशाची एक वेगळी संस्कृती आहे. त्यामुळे जेवढे जास्त प्रादेशिक आपण दाखवू, तितके जास्त आपण जागतिक पातळीवर मोठे होऊ, असे मत नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘कांतारा’ सिनेमाचे अभिनेता व दिग्दर्शक रिषभ शेट्टी यांनी व्यक्त केले.

दाक्षिणात्य निर्माता टी. जी. त्यागराजन यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना ते म्हणाले, मला लहानपणापासून अभिनय करायचा होता. त्यासाठी मी खूप धडपडत होतो. पण अचानक हे क्षेत्र मला दिग्दर्शनच्या मार्गावर घेऊन आले. पण मी हे सुद्धा खूप छान अनुभवत आहे, असे ते यावेळी म्हणाले. सुरुवातीला अभिनेता म्हणून बेलबॉटम चित्रपटात विनोदी नायकाची भूमिका साकारली. पुढे अशाच भूमिका मिळत गेल्या. पण मला वेगळ्या प्रकारचा अभिनयही करायचा होता. म्हणून संहितेला सुरुवात केली तेव्हाच स्वतःची भूमिका निश्चित केली होती, असे त्यांनी सांगितले.

प्रेक्षकांनी स्वतःला आशयासोबत जोडणे महत्त्वाचे सिनेमा कोणताही असो, कोणत्याही भाषेत असो, प्रेक्षकांनी त्या कथेतल्या आशयाशी स्वतःला जोडणे महत्त्वाचे आहे, असे रिषभ यांनी सांगितले. यापुढे दिग्दर्शनालाच प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

निसर्ग आणि माणसांमधील संघर्ष आहे ‘कांतारा’

दुसऱ्या लॉकडाऊनच्या काळात मी घरी बसून होतो. लहानपणापासून या सगळ्या गोष्टी बघत होतो. निसर्ग आणि माणूस यांच्यातील संघर्ष मांडणारा एखादा चित्रपट करावा, असे नेहमी वाटत होते. यावेळी संहिता लिहिली. मीच अभिनय करणार हे नक्की होते. पहिल्यांदाच १ कोटीपेक्षा जास्त पैशात सिनेमा करत होतो. भीती वाटत होती. पण लोकांनी दाखविलेल्या प्रेमाने भारावून गेलो आणि दोन आठवड्यातच तेलगू, तामिळ, हिंदी, इंग्लिश, मल्याळम भाषेत चित्रपट डब केला.

कन्नड भाषेत सिनेमाला प्राधान्य

रिषभ यांनी प्रश्नांना उत्तरे कन्नड भाषेतून देण्यास सुरुवात केली. सर्वांना कन्नडमध्येच अभिवादन केले. प्रेक्षकांच्या विनंतीला मान देऊन ते हिंदीत बोलले. रिषभ म्हणाले की, मला इंग्रजी भाषेची खूप मोठी समस्या आहे. त्यामुळे सिनेमा करतानाही नेहमी कन्नडच करेन. या भाषेमुळेच मला यश मिळाले आहे. त्यामुळे यातच काम करेन, असे त्यांनी सांगितले.