महिला टी-२० विश्वचषक २०२३चे वेळापत्रक जाहीर; दहा संघाचा समावेश

भारत-पाकिस्तान एकाच गटात : १० फेब्रुवारीपासून थरार


03rd October 2022, 11:43 pm
महिला टी-२० विश्वचषक २०२३चे वेळापत्रक जाहीर; दहा संघाचा समावेश

न्यूज डेस्क। गोवन वार्ता
दिल्ली :
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने महिला टी-२० विश्वचषक २०२३ चे वेळापत्रक जाहीर केले आहे. भारत आणि पाकिस्तान संघाला एकाच ग्रुपमध्ये ठेवण्यात आले आहे. या विश्वचषकात दहा महिला संघ सहभागी होणार आहेत. भारताच्या ग्रुपमध्ये पाकिस्तान, वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि आयरलँड या संघाचा समावेश आहे. प्रत्येक ग्रुपमध्ये पाच संघ असतील. अ आणि ब असे दोन ग्रुप करण्यात आले आहेत. आयसीसीने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार, १० फेब्रुवारीपासून महिला टी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. तर २६ फेब्रुवारी रोजी अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे.
पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकामध्ये महिलांचा टी-२० सामना रंगणार आहे. स्पर्धेतील सामने दोन ग्रुपमध्ये होणार आहेत. प्रत्येक ग्रुपमध्ये पाच संघ असतील. ग्रुप अ मध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका, बांगलादेश, न्यूजीलंड आणि श्रीलंका या संघांचा समावेश आहे. तर ग्रुप ब मध्ये भारत, पाकिस्तान, वेस्ट विंडीज, इंग्लंड आणि आयरलँड या संघांना ग्रुप ब मध्ये ठेवण्यात आले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये साखळी फेरीत सामना होणार आहे. केपटाऊनमध्ये २६ फेब्रुवारी रोजी विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. पुरुष टी-२० विश्वचषकानंतर महिलांचा विश्वचषकाचा थरार पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलियात २०२० मध्ये झालेल्या विश्वचषकामध्ये भारतीय संघ उपविजेता ठरला होता. हरमनप्रीतच्या नेतृत्वात भारतीय महिला संघाने चमकदार कामगिरी केली होती. आता पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकावर नाव कोरण्याच्या इराद्याने भारतीय संघाने तयारी सुरू केली आहे.

दक्षिण आफ्रिकेमध्ये आयसीसीने महिला टी-२० विश्वचषकाच्या वेळापत्रकाची घोषणा केली. यावेळी भारताची माजी कर्णधार आणि आयसीसीची राजदूत मिताली राजही उपस्थित होती. वेळापत्रकाची घोषणा आपल्याला टी-२० विश्वचषकाजवळ घेऊन जात आहे. दक्षिण आफ्रिकामध्ये मोठ्या संख्येने प्रेक्षक सामना पाहण्यासाठी येतील, अशी मला अपेक्षा आहे, असे मिताली राज म्हणाली. 

भारतीय संघाचे सामने
१२ फेब्रुवारी विरुद्ध पाकिस्तान
१५ फेब्रुवारी विरुद्ध वेस्ट इंडिज
१८ फेब्रुवारी विरुद्ध इंग्लंड
२० फेब्रुवारी विरुद्ध आयर्लंड